सत्ताधारी आणि विरोधक यांच्या गोंधळामुळे ६ वेळा सभागृह तहकूब !
नागपूर, २२ डिसेंबर (वार्ता.) – दिशा सालियन हिच्या मृत्यूविषयी कुणाकडे काही पुरावे असतील, तर ते सादर करावेत. दिशा हिच्या हत्येची चौकशी विशेष पोलीस पथकाद्वारे करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २२ डिसेंबर या दिवशी सभागृहात केली. या वेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ‘यामध्ये राजकारण करू नये. दिशा सालियन हिच्या मृत्यूची एस् .आय.टी चौकशी करणार असाल, तर पूजा चव्हाण हिच्या मृत्यूचीही चौकशी करावी’, अशी मागणी केली.
ठाकरेंना झटका? दिशा सालियन प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी होणार; देवेंद्र फडणवीस यांची घोषणाhttps://t.co/FzIptGL1fn#DevendraFadnavis #dishasalian #bjp #shivsena #AadityaThackeray
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 22, 2022
यावर उत्तर देतांना गृहमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘दिशा सालियन हिच्या मृत्यूचे अन्वेषण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे कधीही नव्हते. सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूचे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे आहे. दिशा सालियन हिच्या मृत्यूविषयी कोणताही राजकीय अधिवेश न ठेवता नि:पक्षपाती अन्वेषण होईल.’’ गृहमंत्र्यांच्या उत्तरापूर्वी सत्ताधारी पक्षाच्या आमदार मनीषा चौधरी, भारती लवेकर यांनी दिशा सालियन हिच्या मृत्यूची ‘एस् .आय.टी’ चौकशी करण्याची मागणी केली. या मागणीसाठी ५ वेळा सभागृह तहकूब होऊनही सत्ताधारी पक्षाने ही मागणी लावून धरली. शेवटी गृहमंत्र्यांनी एस् .आय.टी चौकशीची घोषणा केली.
विरोधकांकडून पूजा चव्हाण हिच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी !
त्यानंतर विरोधकांनी पूजा चव्हाण हिच्या मृत्यूचीही एस् .आय.टी चौकशीची मागणी करत सभागृहात घोषणा दिल्या. विरोधी पक्षाच्या आमदारांनी अध्यक्षांच्या आसनापुढे येऊन ‘दादागिरी नही चलेगी’, ‘न्याय द्या’ अशा घोषणा देत सरकारचा धिक्कार केला. दोन्ही बाजूंनी निर्माण झालेल्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज ६ व्यांदा १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. या गोंधळामुळे एकूण ६ वेळा १ घंटा २० मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब झाले.