केरळमधील पी.एफ्.आय.चे नेते इस्लामिक स्टेट आणि अल् कायदा यांच्या संपर्कात होते !

एन्.आय.ए.ने विशेष न्यायालयात दिली माहिती !

थिरूवनंतपूरम् (केरळ) – बंदी घालण्यात आलेली जिहादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चे (पी.एफ्.आय.चे) केरळमधील नेते इस्लामिक स्टेट आणि अल् कायदा या जिहादी आतंकवादी संघटनांच्या काही प्रमुख आतंकवाद्यांच्या संपर्कात होते, अशी माहिती राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) विशेष न्यायालयात दिली. या नेत्यांना पी.एफ्.आय.वर बंदी घालण्यात आल्यानंतर अटक करण्यात आली आहे. एन्.आय.ए.ने या नेत्यांच्या चौकशीसाठी अधिक वेळ मागितला आहे.

१. एन्.आय.ए.ने न्यायालयात पुढे सांगितले की, इस्लामिक स्टेट आणि अल् कायदा यांसारख्या आतंकवादी संघटना जेथे स्वतः कारवाया करू शकत नाहीत, तेथे भारतातील आतंकवादी संघटनांचा उपयोग करून घातपात करत आहेत. जिहादी आतंकवादी संघटनेच्या नेत्यांशी पी.एफ्.आय.चे नेते संपर्कात होते. त्यामुळे त्यांची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. पी.एफ्.आय.च्या देशद्रोही कारवायांच्या संदर्भात महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. चौकशीमध्ये पी.एफ्.आय.च्या नेत्यांकडून सामाजिक माध्यमांचा वापर करून युवकांना आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी करून घेतले जात असल्याचीही माहिती मिळाली आहे.

२. न्यायालयाने एन्.आय.ए.ची माहिती ऐकून घेतल्यावर चौकशीसाठी अधिक वेळ दिला. एन्.आय.ए.ने अधिक चौकशी करून आरोपपत्र प्रविष्ट करण्यासाठी ९० दिवसांचा वेळ मागितला होता. तो देण्यात आला आहे.

३. यावर्षी २२ सप्टेंबरला देशभरात धाडी घालून पी.एफ्.आय.च्या शेकडो कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. केरळच्या कोच्ची येथून १३ जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर या संघटनेवर बंदी घालण्यात आली.

संपादकीय भूमिका 

पी.एफ्.आय.च्या अशा देशद्रोही नेत्यांवर जलद गती न्यायालयात खटले चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !