जयपूर येथील ‘ज्ञानम्’ महोत्सवामध्ये ‘धर्म-अध्यात्म : भारतवर्षाचे मूळ प्राण’ या विषयावर परिसंवाद
जयपूर (राजस्थान), २१ डिसेंबर (वार्ता.) – आमच्याकडे वेदांमध्ये धर्म आहे, तर उपनिषदांमध्ये अध्यात्म आहे. माथ्यावर गंध लावावे, असे धर्म सांगतो, तर गंध लावल्याने आज्ञाचक्र जागृत होते, असे आत्म्याशी संबंधित विज्ञान असलेले अध्यात्म सांगते. आद्यशंकराचार्यांनी सांगितले होते, ‘व्यक्तीची व्यावहारिक आणि आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी, तसेच समाजव्यवस्था उत्तम रहाण्यासाठी धर्म आवश्यक आहे.’ चाणक्य म्हणतात, ‘सुखाचे मूळ धर्म आहे.’ त्यामुळे सुखी जीवनासाठी आणि समाजव्यवस्था आदर्श अन् उत्तम रहाण्यासाठी धर्माचे आचरण आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्य समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी केले. ते जयपूर येथे आयोजित ‘ज्ञानम्’ महोत्सवातील ‘धर्म-अध्यात्म : भारतवर्षाचे मूळ प्राण’ या विषयावरील परिसंवादात बोलत होते. या परिसंवादामध्ये जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी करपात्रीजी महाराज आणि दिल्ली येथील सुप्रसिद्ध प्रवचनकार साध्वी प्रज्ञा भारती सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाचे संचालन आचार्य राजेश्वर यांनी केले.
सौजन्य: CityLive
१. या वेळी जगद्गुरु रामानंदाचार्य करपात्रीजी महाराज म्हणाले, ‘‘जग आज चंद्रावर जात आहे; पण प्राचीन काळी यमलोकात जाऊन पतीचे प्राण परत आणणारी सती सावित्री भारतात होती. धर्माच्या आचरणात एवढी शक्ती आहे की, तुम्हाला परलोकात जाण्यासाठी कुठलेही यान लागत नाही.’’
२. साध्वी प्रज्ञा भारती म्हणाल्या, ‘‘धर्माचा अभिमान धर्मश्रद्धेतून निर्माण होतो आणि धर्मश्रद्धा ही धर्माच्या आचरणातून अनुभूती घेतल्याने निर्माण होते. त्यामुळे सकल हिंदु समाजाने धर्माचे आचरण करणे आवश्यक आहे.’’