पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे) – पिंपरी-चिंचवड महापालिकेत निवडणूक सिद्धता चालू झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने छायाचित्र मतदारसूची अद्ययावत् करण्याची प्रक्रिया चालू आहे. यामध्ये मतदारांच्या नवीन नोंदणीसह मतदारसूचीतील तपशीलात दुरुस्तींचाही समावेश केला आहे. पिंपरी-चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघांत अनुमाने ९४ सहस्र मतदार एकसारख्याच चेहर्याचे असल्याची माहिती उघड झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरासह पुणे जिल्ह्यात असे ४ लाख ६७ सहस्र ४१९ जण आढळले आहेत. (एवढ्या मोठ्या संख्येत एकसारख्या चेहर्याच्या मतदारांची नावे मतदारसूचीत समाविष्ट कशी झाली ? याचीही चौकशी झाली पाहिजे ! – संपादक) असे सर्वाधिक, म्हणजे ५० सहस्र ३०४ मतदार हडपसर मतदारसंघात आहेत, तर सर्वांत अल्प, म्हणजे ८ सहस्र ७७५ मतदार जुन्नर मतदारसंघात आहेत.
एकाच मतदारांची नावे ही वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात असल्याचेही आढळून आले. अशा मतदारांचा शोध घेण्याची मोहीम निवडणूक विभागाच्या वतीने राबवली जात आहे. एका मतदाराचे नाव एकाच मतदारसंघात असावे, यासाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे. त्यामुळे एका व्यक्तीचे एकापेक्षा अधिक मतदारसंघांत नाव असल्यास एकच नाव ठेवण्यात येणार आहे. सारख्या चेहर्याचे छायाचित्र असलेल्या आणि एकसारखी नावे असलेल्या व्यक्तींच्या संबंधित पत्त्याची निश्चिती केली जाणार असून ती एकच व्यक्ती असेल, तर एकाच मतदारसूचीत तिचे नाव ठेवले जाणार आहे.
पिंपरी-चिंचवडच्या उपायुक्त स्मिता झगडे यांनी सांगितले की, निरंतर मतदार नोंदणी मोहीम चालू आहे. नागरिकांनी त्यांचे नाव एकापेक्षा अधिक ठिकाणच्या मतदारसूचीत समाविष्ट असल्यास ‘ऑनलाईन’ अर्ज क्र. ७ भरून किंवा जवळच्या मतदार नोंदणी अधिकार्यांच्या कार्यालयात अर्ज भरून स्वत:चे नाव मतदारसूचीतून वगळावे आणि मतदारसूचीचे शुद्धीकरण करण्यासाठी निवडणूक प्रशासनास सहकार्य करावे.