महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला पोलिसांनी अनुमती नाकारली !

  • कर्नाटक सरकारची सीमावासियांवर दडपशाही !

  • मेळाव्याला येणार्‍या अनेकांना कह्यात घेतले !

बेळगाव – महाराष्ट्र एकीकरण समितीच्या टिळकवाडी येथील ‘व्हॅक्सिन डेपो’ मैदानावर होणार्‍या महामेळाव्याला कर्नाटक पोलिसांनी अनुमती नाकारली आहे. या परिसरात १४४ कलमान्वये जमावबंदीचा आदेश घोषित केला आहे. मेळाव्याच्या ठिकाणी येणारे नेते आणि कार्यकर्ते यांना पोलीस कह्यात घेत असून कर्नाटक सरकार सीमवासियांवर दडपशाही करत आहे. येथे मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पोलीस महिला कार्यकर्त्यांसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची धरपकड करत असल्याने याच्या निषेधार्थ माजी आमदार आणि समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणीकर यांनी अन्नत्याग आंदोलन चालू केले आहे.

महाराष्ट्रातील नेत्यांना अडवले !

या महामेळाव्याला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे नेते बेळगावला जाणार होते. कर्नाटक पोलिसांनी त्यांना कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा नदीवरील पुलावरच रोखले. महाराष्ट्रातील नेते आणि पोलीस यांच्यात झटापट झाली. पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला. या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले असून दीड घंटा वाहतूक बंद होती. पोलिसांनी काही काळ आंदोलकांना कह्यात घेऊन त्यांची सुटका केली. महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकात येण्यापासून रोखण्यासाठी सीमाबंदी आदेश कर्नाटक सरकारने लागू केला आहे.