ठाणे, १९ डिसेंबर (वार्ता.) – मुसलमानांच्या अतिक्रमणातून कल्याण येथील मलंगगड मुक्त करण्यासाठी, तसेच हिंदु धर्मियांवर होणारे आघात रोखण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाणारे कल्याण येथील सद्गुरु श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टचे मठाधिपती श्री नवनीतानंद महाराज (पू. अरुण मोडक महाराज) यांचे १९ डिसेंबरला पहाटे पुणे-सातारा महामार्गावर सातारा शहरानजीक अपघातात निधन झाले. त्यांची सुमो गाडी दुभाजकाला धडकल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. यात त्यांचे निधन झाले.
हिंदूंमध्ये जागृती व्हावी आणि त्यांना धर्मकार्यासाठी बळ मिळावे, यासाठी त्यांनी मुंबईसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत ‘श्री स्वामी समर्थ मठां’ची स्थापना केली आहे. राज्यभरात सहस्रो अनुयायी त्यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. हिंदूंना धर्मकार्यासाठी बळ मिळावे; म्हणून श्री नवनीतानंद महाराज मठामध्ये यज्ञ करत असत. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यातही त्यांचा मोलाचा सहभाग असे. समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय आणि प्रांतीय हिंदु अधिवेशनांतही त्यांनी हिंदुत्वनिष्ठांना मार्गदर्शन केले.
कल्याण येथील ‘श्री स्वामी समर्थ मठा’चे संस्थापक श्री नवनीतानंद महाराज (पू. मोडक महाराज) यांच्याविषयीचे अनुभव !
हिंदु जनजागृती समितीविषयी असलेला विश्वास
एकदा एका वर्तमानपत्राच्या संपादकांना सांगतांना महाराज म्हणाले की, मी माझ्याविषयी कोणत्याही वर्तमानपत्रांमध्ये काहीही छापू नये, असे सर्वांना सांगितले आहे. केवळ ‘हिंदु जनजागृती समिती आणि सनातन प्रभात यांनाच माझ्याविषयी छापा’, असे सांगितले आहे. कारण ते योग्य तेच छापतात, याचा मला विश्वास आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या कार्याविषयी महाराजांना विशेष आपुलकी होती. हल्ली झालेल्या भेटीमध्ये महाराज मला म्हणाले की, तुम्ही ज्याप्रमाणे अधिवेशनाचे आयोजन करता, त्याप्रमाणे मी एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. त्या कार्यक्रमाचे सर्व नियोजन तुम्ही करा. हिंदु जनजागृती समितीच्या जून २०२२ मध्ये झालेल्या ‘अखिल भारतीय हिंदु अधिवेशना’मध्ये स्वतःचे नियोजित सर्व कार्यक्रम रहित करून पू. महाराज सहभागी झाले आणि त्यांनी हिंदुत्वनिष्ठ संघटनांना मार्गदर्शनही केले होते.
हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांविषयी प्रेम असलेले पू. मोडक महाराज !
जेव्हा पू. मोडक महाराजांना भेटायचो, तेव्हा ते हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या कार्याचे कौतुक करायचे. एकदा धर्मप्रेमींना सांगताना पू. महाराज म्हणाले ‘‘हिंदु जनजागृती समितीसारखे कार्य सर्वांनी करायला हवे.’’ मी मठात गेल्यावर पू. महाराज आशीर्वाद स्वरूप नेहमी प्रसाद द्यायचे. विशेष कार्यक्रम असल्यास नेहमी शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करायचे.
हिंदूसंघटनाचे कार्य करणार्या हिंदुत्वनिष्ठांना आध्यात्मिक बळ पुरवणे !
पू. महाराज नेहमी मला म्हणायचे की, तुम्ही दिवसभर धर्मप्रचारासाठी बाहेर फिरता. त्यामुळे बसून नामजप करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांना जमत नाही. हिंदुत्वनिष्ठांना शक्ती मिळावी म्हणून मी साधना करतो, अनुष्ठाने करतो. हिंदु तरुणांनी राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असले पाहिजे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत, यासाठी पू. महाराज अखंड प्रयत्नरत होते. – श्री. सुनील कदम, ठाणे