बीड – जिल्ह्यातील गारमाळ (तालुका पाटोदा) या गावातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. त्यांना थर्माकोलच्या तराफ्यावरून प्रतिदिन नदी पार करून शाळेत जावे लागत आहे. ग्रामस्थांनी रस्त्यासाठी आंदोलनाची चेतावणी दिल्यानंतरही प्रशासनाने काहीच उपाययोजना काढली नाही. मुंबईतील बांद्रेकर वाडीतील मित्रमंडळींनी अडीच लाख रुपये व्यय करून मजबूत आणि सुरक्षित अशा ३ तराफा, ११ लाईफ जॅकेट, ८ सुरक्षा कवच, असे साहित्य गावाला भेट दिले होते; मात्र ११ डिसेंबर या दिवशी अज्ञात व्यक्तींनी तराफे जाळून टाकले. याचे अन्वेषण चालू असले तरी विद्यार्थ्यांना पुन्हा थर्माकोलवरून नदी पार करावी लागत आहे. (मूलभूत गरजाही पूर्ण करू न शकणारे प्रशासन नागरिकांना सुशासन काय देणार ? – संपादक)
१२ डिसेंबर या दिवशी थर्माकोलवरून शाळेत जातांना काही विद्यार्थी पाण्यात पडले. यात जीवितहानी झाली नसली, तरी या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. रस्त्यासाठी पाटोदा प्रशासनाला अनेक वेळा निवेदने दिली; मात्र तालुका प्रशासन सहकार्य करत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी केला आहे. या प्रश्नावर १९ डिसेंबर या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वस्तीवरील ग्रामस्थांसह प्रशासनाच्या निषेधार्थ होडी चालवण्याची वल्ही घेऊन ‘चप्पू चालवा’ आंदोलन करण्याची चेतावणी त्यांनी दिली आहे.
संपादकीय भूमिकाअशी संतापजनक स्थिती भारताला स्वातंत्र्य मिळून ७ दशके उलटल्यानंतरही असणे, हे प्रशासनाला लज्जास्पद नव्हे का ? |
(सौजन्य : लोकमित्र न्युज)