(म्हणे) ‘अफझल गुरु धर्मांध नव्हे, तर शिस्तप्रिय होता, मृत्यूनंतर जन्नतमध्ये प्रेषितांना भेटण्यास उत्सुक होता !’

‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ पुस्तकात कोबाड गांधी यांचे विखारी मत !

संभाजीनगर – माओवादी लेखक कोबाड गांधी यांच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकात ‘अफझल गुरु हा धर्मांध नव्हे, तर शिस्तप्रिय होता. मृत्यूनंतर जन्नतमध्ये प्रेषितांना भेटण्यास उत्सुक होता. त्याला खलनायक म्हणून रंगवण्यात आले आहे, तसेच शिवसेनेमुळे वरळी येथे दंगल झाली आहे’, असे अकलेचे तारे तोडले आहेत.

कोबाड यांच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकाच्या मराठी अनुवादाला महाराष्ट्र सरकारने आधी वाङ्मय पुरस्कार घोषित केला; मात्र नंतर काही जणांनी आक्षेप घेतल्यामुळे लगेचच हा पुरस्कार रहित करण्याचा अध्यादेश काढला. सरकारच्या या निर्णयावर मोठ्या प्रमाणावर टीका होत असून २ साहित्यिकांनी आपले वाङ्मय पुरस्कार परत केले आहेत, तर साहित्यांशी संबंधित शासकीय समित्यांवरील ५ पदाधिकार्‍यांनी स्वतःच्या पदाची त्यागपत्रे दिली आहेत. हे पुस्तक नक्षलवादाचे समर्थन करत असल्याचा सरकारचा आक्षेप आहे.

लेखक गांधी यांनी या पुस्तकात पुढील आक्षेपार्ह माहिती दिली आहे…

१. मला तिहार कारागृहात हलवण्यात आले होते. येथे आधीपासून संसद आक्रमण प्रकरणातील आरोपी अफजल गुरु होता. अफझलची फाशी ही अत्यंत स्वातंत्र्यविरोधी कृती होती.

२. वर्ष १९७२ मध्ये दलित पँथर चळवळीने जोर पकडला होता. नामदेव ढसाळ वक्ते असणार्‍या कार्यक्रमात हिंसा उसळली. येथे पोलिसांच्या मुलांनी खाकी कपडे घालून शिवसैनिकांसमवेत दलितांवर आक्रमणे केली. या वादातून वरळी येथे दंगल घडली.

३. खैरलांजी प्रकरणात ४६ जणांवर गुन्हा असतांना ११ लोकांनाच शिक्षा झाली. बहुतांशी दलित असणारे पोलीस, आधुनिक वैद्य आणि सरकारी अधिकारी यांनी हा खटला कमकुवत करण्यासाठी साहाय्य केले. एवढी घटना होऊनही शेजारच्या नक्षलवाद्यांची उपस्थिती असलेल्या गोंदिया येथे काही परिणाम झाला नाही.

प्रत्येक कारागृहात कोबाड यांची व्हायची सरबराई !

कोबाड यांना वर्ष २०१६ मध्ये तिहार कारागृहातून हैदराबादच्या चेरलापल्ली कारागृहात हलवण्यात आले. येथे नक्षलवादी आरोपींनी त्यांना उपाहारगृहातून चिकन आणि बिर्याणी खाऊ घातली. विशाखापट्टणम येथील कारागृहात तथाकथित नक्षलवादी चड्डा भूषणम् याने त्यांचे दायित्व उचलले. सुरत येथील कारागृहात तिहारमध्ये भेटलेला ‘डॉन’ फजलू रहमान याने अहमदाबाद येथील कारागृहातून संपर्क केला आणि तिथे आवश्यक वस्तू देण्याची व्यवस्था केली. या पुस्तकात झारखंडमधील लढे, कारागृहांत भेटलेले ‘डॉन’ किशन पहलवान, बृजेश सिंग, मुन्ना बजरंगी आणि फजलू रहमान यांच्या कामांचे उदात्तीकरण करण्यात आले. (कोबाड यांची अशी सरबराई होत असतांना कारागृह प्रशासन झोपले होते का ? का ते यामध्ये सहभागी होते ? या प्रकरणाची चौकशी करून दोषी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी ! – संपादक)

संपादकीय भूमिका 

‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’पुस्तकात पुष्कळ प्रमाणात आक्षेपार्ह माहिती असतांनाही या पुस्तकावर पुस्तक प्रकाशित झाल्यानंतरच प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी बंदी घालायला हवी होती, तसेच कोबाड गांधी यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी. अशी पुस्तके समाजात विद्वेष पसरवून जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण करतात, हे समाजासाठी घातक आहे, याचा विचार होणे अपेक्षित होते ! सरकार आतातरी कारवाई करणार का ?