चीनचे सैनिक प्रतिवर्षी सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात आणि मार खाऊन जातात ! – मनोज नरवणे, माजी सैन्यदलप्रमुख

माजी सैन्यदलप्रमुख मनोज मुकुंद नरवणे

नवी देहली – चिनी सैन्य हे स्वत:ला २१ व्या शतकातील सर्वांत हुशार आणि व्यावसायिक सैन्य मानते; परंतु त्यांची कृती गुंडगिरी अन् रस्त्यावरील मारामारीपेक्षा अधिक दिसत नाही. हे केवळ आताचे नाही, तर चिनी सैनिक प्रतिवर्षी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात आणि प्रत्येक वेळी त्यांना लाजिरवाणा मार खावा लागतो, अशी माहिती माजी सैन्यदलप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी ‘ए.एन्.आय.’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत दिली.

सौजन्य: ANI News

नरवणे मांडलेली सूत्रे

१. एकीकडे ते तांत्रिक शक्ती दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि दुसरीकडे ते अणकुचीदार दंडुके घेऊन येतात, हे हास्यास्पद आहे.

२. भारत हा असा देश आहे ज्याने जगाला दाखवून दिले आहे की, शेजार्‍यांच्या दादागिरीला आम्ही प्रत्युत्तर देऊ शकतो. मी संपूर्ण देशाला आत्मविश्‍वासाने सांगू शकतो की, आम्ही सदैव सिद्ध आहोत. आमच्यावर जे काही फेकले जाईल, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही सिद्ध आहोत.

३. चीन अनेक वर्षांपासून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थिती टप्प्याटप्प्याने पालटण्याचा प्रयत्न करत आहे.

४. आम्ही नेहमीच ‘पेट्रोलिंग पाईंट १५’ पर्यंत गस्त घालत असतो; परंतु चिनी सैनिक आम्हाला ‘पेट्रोलिंग पॉइंट’वर जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत होते. हे पूर्णपणे अस्वीकार्य होते. आम्हाला गस्त घालण्यापासून रोखण्यासाठी त्यांनी एक छोटी चौकी उभारली होती, ज्यावर आम्ही जोरदार आक्षेप घेतला. असे असूनही ‘आम्ही मागे हटणार नाही’ यावर ते ठाम राहिले. यावर आपल्या सैन्याने अधिक जोरदार निषेध केला. त्यानंतर चिनी सैनिक अधिक संख्याबळासह आले. या प्रकरणावरून येथेे हाणामारीही झाली. तथापि आपले सैन्य त्यांना परत पाठवण्यासाठी पुरेसे होते.

५. माजी जनरल नरवणे यांनी पाकिस्तानचे माजी सैन्यदलप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांचे ‘वर्ष १९७१च्या बांगलादेश युद्धातील पराभव हा राजकीय पराभव होता, पाकिस्तानी सैन्याचा पराभव नव्हता. पाकच्या केवळ ३४ सहस्र सैनिकांनी भारतासमोर आत्मसमर्पण केले होते, ९३ सहस्र नाही’, हे विधान फेटाळून लावले. ते म्हणाले की, तुम्ही तथ्य आणि इतिहास पालटू शकत नाही. वर्ष १९७१ मध्ये पाकिस्तानी सैन्याचे जनरल नियाझी आत्मसमर्पण करतांनाचेे छायाचित्र ‘आपण (भारत) काहीही न बोलता काय करू शकतो ?’, हे दाखवतो. कारगिलच्या वेळीही पाकने सत्य स्वीकारले नव्हते.