एकदा एका व्यभिचारी स्त्रीला दगडांनी मारण्यासाठी लोक जमले होते. येशू ख्रिस्त तिथे पोचले. ते म्हणाले, ‘‘ज्याने आयुष्यात कधीही पाप केले नसेल, त्याने पहिला दगड मारावा.’’ कुणीही दगड मारू शकला नाही. ख्रिस्ताच्या आयुष्यातील या प्रसंगाचा गौरवपूर्ण उल्लेख हिंदुस्थानसह संपूर्ण जगात पुनःपुन्हा केला जातो. ख्रिस्त केवळ बोललेच होते; पण त्याच्या कितीतरी आधी त्रेतायुगात सीतेने हे प्रत्यक्ष आचरले होते; पण हिंदूंना हे ठाऊकच नसते आणि कोणी सांगतही नाही.
१. रावणाचा वध झाल्यावर ती आनंदवार्ता घेऊन हनुमान माता सीतेकडे येणे आणि त्याने तिला ‘तुम्हाला त्रास दिलेल्याला काय शिक्षा करू ?’, असे विचारणे
‘वाल्मीकि रामायणात एक प्रसंग आहे. जेव्हा रामचंद्रांचा विजय झाला, तेव्हा भगवंताचा संदेश घेऊन हनुमान अशोक वनामध्ये जगत्-जननी सीतेकडे गेला. त्याने सीतेला सांगितले, ‘‘रावण मारला गेला आणि रामचंद्र जिंकले. हा सुखद-संदेश घेऊन मी तुमच्याकडे आलो आहे.’ त्यानंतर बोलण्याच्या ओघात हनुमान म्हणाला, ‘‘तुमच्याभोवती हे जे राक्षस-राक्षसी आहेत, त्यांनी तुम्हाला फार त्रास दिला आहे. तुमची आज्ञा असेल, तर यांतील काहींना पायाखाली चिरडतो, काहींना हाताने चुरगळतो आणि काहींचा पाय उपटतो.’’
२. मानवता शिकवणारा उदात्त हिंदु धर्म !
वाल्मीकि रामायणामध्ये अतिशय उदात्त मानवतेचे वर्णन असल्याने जानकी हनुमंताला म्हणते,
पापानां वा शुभानां वा वधार्हाणामथापि वा ।
कार्ये कारुण्यमार्गेण न कश्चिन्नापराध्यति ।।
– वाल्मीकि रामायण, काण्ड ६, सर्ग ११३, श्लोक ४५
अर्थ : कुणी पापी अथवा पुण्यात्मा किंवा वध केला जाण्यायोग्य असो, त्याच्याशी कारुण्याच्या मार्गानेच वागावे. (कारण) ज्याने कधीही अपराध केला नाही, असा कुणीही नाही.
अपराध्याला शिक्षा झाली पाहिजे; पण जगात ‘ज्याने कोणता ना कोणता अपराध केलाच नसेल’, असा कुणीही नाही. हे स्वर्णाक्षरांनी लिहिण्याजोगे कथन वाल्मीकि रामायणामध्ये भरत आणि सीता यांच्या तोंडी अनेक वेळा आले आहे. त्यामुळे सत्पुरुषाने सर्वांवर करुणा केली पाहिजे.’
(साभार : ‘स्वामी अखंडानंद सरस्वती’ (‘दैवी सम्पद योग’) या हिंदी ग्रंथातील प्रकरण ७ मधील उतार्याचे मराठीत भाषांतर)