‘सेबी’ने (‘सेक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया’ने म्हणजेच भारतीय रोखे आणि विनिमय मंडळाने) दिलेल्या माहितीनुसार ‘कार्वी स्टॉक ब्रोकिंग’ने (समभाग विक्री करणारे आस्थापन) ग्राहकांच्या खात्यातील समभाग विकून १ सहस्र ९६ कोटी रुपये त्यांच्या समूहाचे आस्थापन असलेल्या ‘कार्वी रिॲल्टी’मध्ये (स्थावर मालमत्ता विक्री करणारे आस्थापन) हस्तांतरण केले. हे समभाग एप्रिल २०१६ ते डिसेंबर २०१९ या काळात विकण्यात आले होते. या प्रकरणाची ‘सेबी’ने चौकशी केली. तेव्हा यात मोठा घोटाळा झाल्याचे उघड झाले. हा घोटाळा २ सहस्र कोटी रुपयांचा असल्याचे म्हटले जाते.
१. कार्वी घोटाळा कसा झाला ?
बँकांकडून कर्ज घेण्यासाठी लोकांना काही तारण ठेवणे आवश्यक असते. कर्जाची जेवढी मागणी केली जाते, तेवढ्याच प्रमाणात बँकांना तारण ठेवावे लागते. जसे एखाद्या व्यक्तीचे ‘डिमॅट’ खाते (इलेक्ट्रॉनिक पद्धतीचे समभाग आणि रोखे विक्रीचे खाते) असते. तसेच ब्रोकरचे (समभाग (शेअर्स) विक्री करणारा दलाल) ‘पूल’ खाते (समभाग विक्री करणार्या दलालाकडे पैसे ठेवण्यासाठीचे खाते) असते. आपल्या मनात शंका येईल की, गुंतवणूकदारांच्या मालकीचे समभाग (शेअर्स) अचानक ब्रोकरकडे कसे गहाण ठेवता येतील ? येथेच ‘पॉवर ऑफ ॲटर्नी’चा (कुलमुखत्यार पत्र) प्रवेश होतो. हे ‘पॉवर ऑफ ॲटर्नी’ दलालांना व्यक्तीच्या ‘डीमॅट’ खात्यातून समभाग घेण्याचा अधिकार देते. ‘एन्.एस्.डी.एल्.’ (नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लि.) आणि ‘सी.डी.एस्.एल्.’ (सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लि.) यांच्याकडे समभाग साठवले जातात. भारतातील या केवळ दोन ‘डिपॉझिटरीज’ (वित्तीय संस्था) आहेत. ग्राहकाच्या ‘डीमॅट’ खात्यात इलेक्ट्रॉनिक स्वरूपात समभाग सुरक्षित ठेवणे, हे त्यांचे काम आहे. ‘एन्.एस्.डी.एल्.’ आणि ‘सी.डी.एस्.एल्.’ हे दोन्ही व्यवहारांविषयी खातेधारकांना साप्ताहिक किंवा मासिक अहवाल देतात. अशा प्रकारे समभाग विक्री करणार्या आस्थापनांनी त्यांच्या कार्यपद्धतींमध्ये प्रामाणिक असले पाहिजे; कारण खातेधारकांकडून कोणतीही भिन्नता पकडली जाऊ शकते. असे असूनही ‘कार्वी’ने येथे पळवाट शोधली. ते अशी खाती ओळखतात की, ज्यात समभागधारक विशेष सक्रीय नसतात, उदा. काही गुंतवणूकदार समभाग खरेदी करून ठेवतात आणि १ – २ वर्षे कोणतीही उलाढाल न करता त्यांच्या खात्यात ठेवतात. अशा निष्क्रीय खात्यातील काही समभाग ‘कार्वी स्टॉक ब्रोकिंग लिमिटेड’ या आस्थापनाने ‘पॉवर ऑफ ॲटर्नी’च्या साहाय्याने त्यांच्या ‘पूल’ खात्यात हस्तांतरित केले. त्यानंतर विविध बँकांशी संपर्क साधून या समभागांवर कर्ज उचलले.
२. ‘नॅशनल स्टॉक एक्सचेंज’ने ‘कार्वी स्टॉक ब्रोकिंग लिमिटेड’वर नवीन ग्राहक जोडण्यास प्रतिबंध घालणे
येथे प्रश्न असा उपस्थित होतो की, हे वैध आहे का ? अर्थात्च ‘नाही !’ ही कर्जे कुणाला देण्यात आली ? ‘कार्वी’ने अशा प्रकारे संबंधित समभागधारकांच्या संमतीविना बँकांकडून कर्जे घेतली. त्यानंतर ती कार्वीच्याच ‘कार्वीज रिॲल्टी प्रायव्हेट लिमिटेड’ या उपआस्थापनात हस्तांतरित केली. हे उपआस्थापन रिअल इस्टेट आणि मालमत्ता या सेवांमध्ये सहभागी आहे. ती रिॲल्टी क्षेत्राशी संबंधित ग्राहकांना गुंतवणूक, वित्तपुरवठा आणि सल्ला देणे यांविषयीची सेवा पुरवते. २२ नोव्हेंबर २०१९ या दिवशी ‘सेबी’ने घोषणा केली की, ‘एन्.एस्.ई.’ (नॅशनल स्टॉक एक्सचेंज)ला काही अनियमितता आढळली. त्यामुळे त्यांनी ‘कार्वी स्टॉक ब्रोकिंग लिमिटेड’ला आणखी ग्राहक जोडण्यास प्रतिबंध केला आहे. या घोषणेमुळे कोणताही नवीन व्यापारी ‘कार्वी स्टॉक ब्रोकिंग’मध्ये स्वतःचे खाते उघडू शकत नाही.
सेबीने वर्षभर अन्वेषण केल्यानंतर २३ नोव्हेंबर २०२० या दिवशी ‘नॅशनल स्टॉक एक्सचेंज’ने ‘कार्वी स्टॉक ब्रोकिंग लिमिटेड’ला ‘डिफॉल्टर’ (अफरातफर करणारे) म्हणून घोषित केले. तसेच त्यांनी या ‘ब्रोकिंग फर्म’ला सदस्यत्वातूनही काढले.
३. ‘सेबी’ने ‘बाँबे स्टॉक एक्सचेंज’ आणि ‘नॅशनल स्टॉक एक्सचेंज’ यांना दंड ठोठावणे, तसेच नवीन नियमावली बनवणे
यामुळे ‘बी.एस्.ई.’ (बाँबे स्टॉक एक्सचेंज) आणि ‘एन्.एस्.ई.’ (नॅशनल स्टॉक एक्सेंज) यांना मोठा धक्का बसला. या प्रकरणी बाजार नियामक ‘सेबी’ने देशातील दोन प्रमुख स्टॉक एक्सचेंज ‘बी.एस्.ई.’ आणि ‘एन्.एस्.ई.’ यांना अनुक्रमे ३ कोटी अन् २ कोटी रुपयांचा दंड ठोठावला. ‘सेबी’ने हा दंड ‘कार्वी स्टॉक ब्रोकिंग लिमिटेड’ घोटाळ्याच्या प्रकरणी लावला आहे. या २ सहस्र कोटी रुपयांच्या घोटाळ्यामुळे ‘सेबी’ जागी झाली. आपल्या डोळ्यांदेखत अशी घटना होऊ शकते, हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्वरित १ सप्टेंबर २०२० या दिवशी नवीन नियम सिद्ध केला. या नियमानुसार गुंतवणूकदाराला विचारल्याविना त्याच्या ‘डिमॅट’मधील समभाग काढता येणार नाही आणि विकताही येणार नाही, तसेच ते गहाणही ठेवू शकत नाही. जर एखाद्या गुंतवणूकदाराला त्याचे समभाग गहाण ठेवायचे असतील, तर त्यासाठी ‘ओटीपी मेकॅनिझम’ (भ्रमणभाषवर संकेतांक येण्याची पद्धत) लागू केले आहे.
४. गुंतवणूकदारांनी त्यांच्या ‘डिमॅट’ खात्याची नियमित पडताळणी करणे आवश्यक !
कार्वी घोटाळ्यातील अपप्रकारामुळे काही मूलभूत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
अ. कार्वी हे ‘स्टॉक’ (समभाग) त्यांच्या पूल खात्यात टाकत असेल, तर ‘एन्.एस्.डी.एल्.’ किंवा ‘सी.डी.एस्.एल्.’ डिमॅट खात्यांमध्ये विसंगती शोधण्यात अयशस्वी कसे झाले ?
आ. सर्व ब्रोकरेज आस्थापनांवर लक्ष ठेवणार्या ‘एन्.एस्.ई.’ किंवा ‘बी.एस्.ई.’ यांना ३ वर्षांपासून एकही अपप्रकार कसा सापडला नाही ?
इ. ४ वर्षांत एकदाही लेखापरीक्षण झाले नाही का ? आणि त्याच्यामध्ये काहीच कसे सापडले नाही ?
ई. बँकांनी थर्ड पार्टीचे (तिसर्या व्यक्तीचे) समभाग तारण म्हणून घेण्यापूर्वी कोणतीही पार्श्वभूमी कशी पडताळली नाही ? त्यांनी त्या समभागांच्या मालकांची उलट तपासणी करायला हवी होती ना ?
यांपैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देणे कठीण आहे. एक गुंतवणूकदार म्हणून आपल्या डिमॅट खात्याची नियमित पडताळणी करत रहाणे, हे तुमचे दायित्व आहे. तुमच्या खात्यात काही विचित्र पालट होत असल्यास तुम्ही त्वरित तुमच्या ‘ब्रोकरेज’ आस्थापनाशी संपर्क करा आणि त्याविषयी विचारणा करा. या आस्थापनाने दिलेले उत्तर जर तुम्हाला पटले नसेल, तर हा तुमचा हक्क आहे की, तुम्ही पुढची पावले उचलू शकता. ‘एन्.एस्.ई.’ किंवा ‘बी.एस्.ई.’ यांच्याकडे तक्रार प्रविष्ट करू शकता. त्यातूनही उत्तर आले नाही, तर ‘सेबी’कडे तक्रार प्रविष्ट करू शकता.
– श्री. अभिषेक मुरुकटे, वरळी, मुंबई. (१९.११.२०२२)