अनघा लेले यांनी केला होता अनुवाद !
मुंबई – नक्षलवादी चळवळीचे समर्थक कोबाड गांधी यांच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकाच्या अनुवादासाठी महाराष्ट्र सरकारकडून ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी’ पुरस्कार घोषित करण्यात आला होता. हा पुरस्कार सरकारने रहित केला आहे. पुरस्काराची निवड करण्यासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने नेमलेली परीक्षण समितीही सरकारने रहित केली आहे. हा पुरस्कार घोषित झाल्यावर विविध स्तरांवरून होत असलेल्या टीकेमुळे राज्य सरकारने याविषयी चौकशी अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता. अहवाल प्राप्त झाल्यानंतर हा पुरस्कार सरकारने रहित केला.
कोबाड गांधी यांच्या पुस्तकाच्या अनुवादासाठी अनघा लेले यांना जाहीर झालेला पुरस्कारही रद्द केला. https://t.co/5P3Yfgukj4#ajitpawar #MarathiNews #MaharashtraNews
— News18Lokmat (@News18lokmat) December 14, 2022
मराठी भाषेतील उत्कृष्ट मराठी वाङमय निर्मितीसाठी राज्य सरकारकडून ‘यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय’ पुरस्कार देण्यात येतो. या अंतर्गत वर्ष २०२०-२१ च्या ३३ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये अनघा लेले यांनी केलेल्या कोबाड गांधी यांच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकाच्या अनुवादाला पुरस्कार घोषित करण्यात आला होता. कोबाड गांधी हे माओवाद्यांच्या उच्चाधिकार समितीचे (‘पॉलिट ब्युरो’चे) सदस्य आहेत. देशात नक्षलवादाचे जाळे पसरवण्याच्या आरोपाखाली वर्ष २००९ मध्ये कोबाड यांना देहली पोलिसांनी अटक केली होती. माओवादी कारवायांच्या आरोपाखाली त्यांना १० वर्षे कारावास भोगवा लागला. त्यानंतर न्यायालयाने त्यांची निर्दाेष मुक्तता केली. असे असले, तरी कोबाड गांधी हे ‘नक्षलवादी गटांना वैचारिक खतपाणी घालणारे आणि स्वत:चे आयुष्य नक्षलवाद्यांसाठी समर्पित केलेले नेते’ म्हणून ओळखले जातात.
पुरस्कार रहित केल्याच्या निषेधार्थ लेखक शरद बाविस्कर यांनी स्वतःचा पुरस्कार नाकारला !
हा पुरस्कार रहित केल्याचा निषेध करत लेखक शरद बाविस्कर यांनी त्यांना घोषित झालेला ‘लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार’ नाकारला. शरद बाविस्कर हे देहली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापिठात फ्रेंच तत्त्वज्ञानाच्या विषयाचे प्राध्यापक आहेत.
माओवाद्यांच्या पक्षातून कोबाड गांधी यांची हकालपट्टी !
‘फ्रॅक्चर फ्रीडम’ या पुस्तकातील लिखाणावरून कोबाड गांधी यांची पक्षातून हकालपट्टी करत आहे, असे माओवाद्यांनी एका पत्रकाद्वारे सांगितले. माओवाद्यांच्या दृष्टीने हे पुस्तक पक्षाच्या पूर्वअनुमतीविना प्रकाशित केले असून पक्ष विचारसरणीच्या विरोधात आहे. या पुस्तकातून कोबाड गांधी यांनी ‘बुर्झ्वा’ सिद्धांत उचलून धरल्याचा आरोप करण्यात आला आहे. मार्क्सवाद, लेनिनवाद आणि माओवाद यांच्या मूळ तत्त्वाला विरोध करणे, शासनकर्त्यांसमोर शरणागती पत्करणे आणि वर्ग संघर्षाऐवजी वर्ग समरसता निवडणे आदी आरोप करत माओवाद्यांनी गांधी यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
कोण आहेत कोबाड गांधी ?
कोबाड गांधी हे अनेक वर्षे माओवादी चळवळीचे ज्येष्ठ नेते आणि चळवळीचे मार्गदर्शक समजले जात होते. गरीब आणि कष्टकरी वर्गाविषयी असलेली आस्था आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा मार्ग त्यांनी निवडला होता. माओवादी चळवळीशी संबंधित असल्याच्या आरोपावरून वर्ष २००९ ते २०१९ अशी १० वर्षे कोबाड गांधी कारागृहात राहिले. त्यांनी नक्षली चळवळीचा संबंध नसल्याचे सांगितले होते. अन्वेषण यंत्रणांकडेही ठोस पुरावे नव्हते. ओळख लपवणे आणि फसवणुकीचा एक आरोप कोबाड गांधी यांच्यावर सिद्ध झाला होता. त्यात त्यांना शिक्षा झाली. कोबाड गांधी यांनी नक्षली संबंध नाकारला असला, तरी त्यांचा नक्षली विचारांना पाठिंबा असल्याचे सांगितले होते.
संपादकीय भूमिका
|