नवाब मलिक यांच्या जामिनासाठी तातडीने सुनावणीस न्यायालयाचा नकार !

नवाब मलिक

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांच्या जामिनावर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. ६ जानेवारी २०२३ या दिवशी त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी होणार आहे.

प्रकृती ठीक नसल्यामुळे मलिक यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यात यावी, यासाठी त्यांच्या अधिवक्त्यांकडून न्यायालयाला विनंती करण्यात आली होती. काही दिवसांपासून मलिक खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. मलिक यांच्या प्रकृतीविषयी २ आठवड्यांमध्ये उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला दिले आहेत. विशेष न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आतंकवादी दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित कुर्ला येथील गोवावाला कंपाऊंडची मालमत्ता खरेदी केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने २३ फेब्रुवारीला मलिक यांना अटक केली होती.