आगरतळा (त्रिपुरा) येथे अष्टलक्ष्मी संत विचार संमेलन भावपूर्ण आणि उत्साही वातावरणात पार पडले !

संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी विविध मान्यवर

आगरतळा (त्रिपुरा) – त्रिपुरा सरकारचा पर्यटन विभाग, ‘अमरवाणी इव्हेंट फाऊंडेशन’ आणि ‘इंडस मून प्रायव्हेट लिमिटेड’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  अष्टलक्ष्मी संत विचार संमेलन भावपूर्ण आणि उत्साही वातावरणात पार पडले.

विठ्ठलाच्या नामाच्या गजरात रंगलेले बाल वारकरी

शांती काली आश्रमाचे महंत चित्त महाराज यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या शोभायात्रेत मान्यवर साधू-संत, अभ्यासक यांसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. शोभायात्रेत महाराष्ट्राच्या बाल वारकर्‍यांची दिंडी लक्षवेधी ठरली. उद्घाटन कार्यक्रमातही वारकर्‍यांनी कृष्णगीतावर आधारित नृत्याविष्काराद्वारे जागर केला. अशा प्रकारे टाळ-चिपळ्या, मृदुंग, ढोल, हार्मोनियम यांच्या सुरावटींवर विठूनामाच्या गजरात त्रिपुरानगरी दुमदुमून गेली.

या शोभायात्रेत ईशान्य आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा ‘भक्तीसंगम’ पहायला मिळाला. ईशान्येकडील राज्यांमधील पारंपरिक नृत्य प्रकारांचाही यात समावेश होता.