मृत्यूपत्र करतांना घ्यावयाची काळजी !

मृत्यूपत्र (विल) करतांना चुका झाल्या, तर ‘मृत्यूपत्रामधील चुका अंगाशी येतात. माणूस बोलायचा बंद झाला की, त्याचे मृत्यूपत्र बोलू लागते. ते काय बोलते ? त्यामध्ये जे काही लिहिलेले आहे, तेच ते वाचून दाखवते. त्यामुळे त्यात घाईगडबडीत काही चुका झाल्या असतील किंवा मसुदा सिद्ध (ड्राफ्टिंग) करतांना महत्त्वाच्या सूत्रांचा तपशीलच लिहिला गेला नसेल, तर ते मृत्यूपत्र चुकीच्या गोष्टी सांगू लागते; परंतु तोपर्यंत या गोष्टी लक्षातच न आल्यामुळे पुष्कळ विलंब झालेला असतो. मृत्यूपत्र करणार्‍याने यासंदर्भात कोणती दक्षता घ्यावी ? याविषयीची सूत्रे पुढील लेखाद्वारे दिली आहेत.

अधिवक्ता शैलेश कुलकर्णी

१. मृत्यूपत्रात झालेल्या चुका संबंधित व्यक्ती जिवंत असतांनाच लक्षात येणे आवश्यक असणे, अन्यथा मृत्यूपत्र करण्याच्या मूळ उद्देशालाच तडा जाणे

मृत्यूपत्र लिहिणारा जर जिवंत असेल आणि मसुद्यातील (‘ड्राफ्ट’मधील) चुका त्याच्या लक्षात आल्या, तर त्या वेळेत दुरुस्त करता येतात; पण जर ते लक्षातच आले नाही, तर त्याच्या निधनानंतर त्याच्या वारसदारांना अतोनात त्रास अन् मनस्ताप सहन करावा लागतो; कारण एकदा केलेले मृत्यूपत्र मरणानंतर पालटता येत नाही. यामुळे संपत्ती अडचणीत येते किंवा वाटणी नीट होत नाही. पुष्कळ वेळा कोर्ट-कचेर्‍या होतात. मृत्यूपत्रानुसार ते करणार्‍या पुरुषाला (‘टेस्टेटर’ला) जशी आणि ज्याला संपत्ती द्यायची होती, त्या मूलभूत संज्ञेलाच तडा जातो. नकोसा वाटणारा ‘वारसा कायदा’ (सक्सेशन अ‍ॅक्ट) लागतो. मग कायदेशीर वारसांनाच केवळ त्याची मालकी मिळते. अशा प्रसंगात मूळ उद्देशालाच तडा जातो.

२. स्वतःची संपत्ती कुणाला द्यावी ? याविषयीच्या मालकी हक्काची इच्छापूर्ती केवळ मृत्यूपत्र करतांनाच पूर्ण होणे 

मृत्यूपत्र म्हणजे मरणार्‍याच्या इच्छेनुसार संपत्तीचे वाटप त्याच्या मृत्यूनंतर केले जाते. मृत्यूपत्र करणारी व्यक्ती स्वतःला पाहिजे त्याला, उदा. मित्र-मैत्रिणी, गरीब, कामवाली बाई, जुना नोकर, लहानपणीचा; पण सध्या हालाखीत असलेला मित्र किंवा गरजू विद्यार्थी यांना कुणालाही साहाय्य करायची इच्छा आहे, अशांना स्वतःची संपत्ती देऊ शकते. हा एक प्रकारचा ‘मानवी हक्क’ (ह्युमन राईट्स) आपल्याला बहाल केलेला आहे. ही इच्छापूर्ती केवळ मृत्यूपत्र करतांनाच पूर्ण होते.

३. मृत्यूपत्राच्या मसुद्यात होणार्‍या विविध चुका !

मृत्यूपत्राच्या मसुद्यामध्ये काही चुका झाल्यास त्या पुढे निस्तराव्या लागतात. काही मसुद्यामध्ये नावांच्या ‘स्पेलिंग’मध्ये चुका होतात. काही वेळा आधारकार्ड क्रमांक चुकीचा लिहिला जातो. स्थावर मालमत्तेचा (प्रॉपर्टीचा) भूमापन (सर्व्हे) क्रमांक जर चुकला, तर पुढे १/१४ नोंदीसाठी पुष्कळ अडचणी येतात. काही जण मृत्यूपत्र केवळ नोंदणीकृत (नोटरी) करतात; पण त्यातही घोटाळे होतात. कधी कधी स्वतःच्या मालकीच्या नसलेल्या मालमत्तेचा उल्लेख केला जातो आणि पुढे घोटाळे होतात.

३ अ. तपशीलातील चुकीचा परिणाम : मृत्यूपत्र करणार्‍या व्यक्तीला जर एखाद्या व्यक्तीला संबंधित मालमत्ता द्यायची नसेल; कारण त्यांनी मृत्यूपत्र बनवणार्‍या व्यक्तीला पूर्वायुष्यात त्रास दिला असेल, तरीसुद्धा तपशीलाच्या चुकीमुळे त्या संबंधित व्यक्तीला ती मालमत्ता मालकी हक्काने अथवा वारसा हक्काने मिळते.

४. मृत्यूपत्र करणार्‍याचा आणि त्याची मालमत्ता मिळणार असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास काय होते ?

मृत्यूपत्र करणार्‍याने ज्यांना मालमत्ता देण्याची इच्छा व्यक्त केली असेल, अशी व्यक्ती जर आधीच मृत्यू पावली आणि तद्नंतर या मृत्यूपत्रामध्ये पालट न करता मृत्यूपत्र करणाराही जर मृत पावला, तर त्या मालमत्तेला ‘भारतीय वारसा कायदा’ लागतो.

५. मृत्यूपत्र आणि त्याचे आध्यात्मिक स्तरावरील महत्त्व 

काही जण काही भाग वारसदारांना, काही नातवंडांना, तर काही भाग स्वतःच्या गतकाळात अडीअडचणीत असतांना उपयोगी पडलेल्या व्यक्तीला देऊ करतात. याला आपण ‘परोपकार’ही म्हणू शकतो. ‘गुरुचरित्रा’मध्ये असे पुण्य आणि परतफेड यांचा तपशील दिलेला आहे. ‘मृत्यूपत्र’ हा एक आध्यात्मिक दस्त (धारिका) असू शकतो. त्यात मागील जन्मांच्या सुकृताची परतफेड करण्याची संधी प्राप्त होते. ‘मृत्यूपत्र’ करणार्‍याचा सबब इच्छापूर्ती हा एकमेव हेतू असतो.

६. मृत्यूपत्र करणार्‍या व्यक्तीची धारणा कशी असावी ?

मृत्यूपत्र करणारी व्यक्ती जर आध्यात्मिक विचारधारेची असेल आणि तिच्या नावडत्या व्यक्तीला ती मालमत्ता जात असेल अन् जिवंत असेपर्यंत त्या व्यक्तीची हीच इच्छा असेल की, त्या व्यक्तीला मालमत्ता मिळू नये, तर येथे त्याच्या आत्म्याच्या पुढील प्रवासात अडथळे येऊ शकतात. अर्थात् हा प्रत्येक व्यक्तीच्या धारणेचा भाग आहे.

थोडक्यात काय, तर नैतिक, विवेक, भावनिक आणि आध्यात्मिक अशा सर्वच दृष्टीने नीट अन् काटेकोर मृत्यूपत्र करणे आवश्यक आहे, अन्यथा त्यात चुका झाल्यास त्या हानीकारक ठरतात.’
– अधिवक्ता शैलेश कुलकर्णी, कुर्टी, फोंडा गोवा.

गोवा येथे मृत्यूपत्र करण्याविषयी केली जाणारी तपशीलवार प्रक्रिया !

१. गोव्यात नोंदणीकृत मृत्यूपत्र करावे लागणे

देशात मृत्यूपत्र करण्यासाठी किचकट गोष्टी कराव्या लागत नाहीत; पण तशा गोष्टी गोव्यासाठी लागू नाहीत, हे प्रथम लक्षात घ्यायला हवे. गोव्यात समान नागरी कायदा असल्यामुळे थोडे कायदे आहेत. गोव्यामध्ये मृत्यूपत्र हे नोंदणीकृत (रजिस्टर्ड) करावे लागते. तसे झाल्यासच कायदेशीर पूर्तता करता येते.

२. मृत्यूपत्र करणारा पुरुष असल्यास त्याला ‘टेस्टेटर’ असे म्हणतात आणि मृत्यूपत्र करणारी स्त्री असल्यास तिला ‘टेस्टॅट्रिकस’ असे म्हटले जाते.

३. मृत्यूपत्र करणार्‍या व्यक्तीच्या मृत्यूनंतर होत असलेली प्रक्रिया !

आपापल्या विभागातील उपनिबंधक कार्यालयात मृत्यूपत्राची नोंद केली जाते. मृत्यूपत्र करणार्‍याच्या मृत्यूनंतर या नोंद केलेल्या मृत्यूपत्रानुसार लगेचच आणि विनासायास मालमत्तेची वाटणी करता येते. विशेषत: घर, भूमी, दुकान अशा स्थावर मालमत्तेवर मामलेदार (तहसीलदार) कार्यालयात १/१४ कागदपत्रांवर नाव चढवायला अतिशय सोपे जाते.

४. गोव्यात पती-पत्नी यांचा समान हक्क असल्यामुळे मृत्यूपत्राच्या संदर्भात होणारी प्रक्रिया !

गोव्यामध्ये प्रत्येक घर, भूमी, दुकान अशा स्थावर मालमत्तेवर पती-पत्नी यांचा समान हक्क असतो. त्यामुळे तेथे जर नवर्‍याला केवळ एकट्याला अथवा पत्नीला एकटीला मृत्यूपत्र करावयाचे असल्यास तो किंवा ती आपापल्या अर्ध्या मालकी भागाचीच वाटणी करू शकतात. त्यामुळे बहुतांश वेळेला हे मृत्यूपत्र एकत्रपणेच केले जाते. याला ‘कंसेंट विल’ असे म्हणतात. याचा एक विशिष्ट ड्राफ्ट (मसुदा) असतो. तो नोंदणी निबंधक (रजिस्ट्रार) कार्यालयात नमुनाही मिळतो.

अ. मृत्यूपत्र करतांना ३ ड्राफ्ट केले जातात. एक पुरुषाचा, एक स्त्रीचा आणि एक दोघांचा मिळून एकत्र असतो.

आ. कुणाकुणाला काय द्यायचे आहे, याची अतिशय काटेकोर आणि परिपूर्ण माहिती यात दिलेली बरी पडते.

इ. विशेषत: भूमी घराविषयी सर्व्हे क्रमांकासह संपूर्ण पत्ता लिहिणे आवश्यक आहे. अन्यथा पुढे अडचणी उद्भवू शकतात.

ई. या कामासाठी टेस्टेटर, टेस्टॅट्रिक्स, गोव्यातील पत्ता असलेले साक्षीदार आणि रिप्रेझेंटर (सादरकर्ते) या सर्वांचे आधारकार्ड आवश्यक असते.

उ. मृत्यूपत्र करणार्‍यांपैकी एखादा जर मराठीतून स्वाक्षरी करत असेल, तर ते मृत्यूपत्र तंतोेतंत मराठीमध्ये अनुवादित करावे लागते. एकदा सर्व ड्राफ्ट्स निबंधक कार्यालयात दिले की, ते सर्व लिखाण त्या कार्यालयातील एक कर्मचारी शासकीय नोंदवहीत स्वहस्ते लिहितो. मराठी अनुवाद असेल, तर आपल्यापैकी कुणाला तरी मराठी भाषेत त्यांच्या नोंदवहीत तो लिहावा लागतो.

ऊ. सर्व ड्राफ्ट्स प्रविष्ट केल्यानंतर आपल्याला वार आणि वेळ कळवली जाते. त्या वेळेस सर्वांनी कार्यालयात जावे लागते. सर्वांचे अंगठ्याचे शिक्के आणि स्वाक्षर्‍या घेतल्या जातात.

ए. मृत्यूपत्राचे सर्व लिखाण निबंधक अधिकारी हा मृत्यूपत्र करणार्‍या दोघांनाही परत एकदा वाचून दाखवतो आणि कुठेही दडपण नसल्याची निश्चिती करतो.

. साधारण ४०० रुपयांचे ‘रेव्हेन्यू स्टँप’ त्या दिवशी घेऊन जावे लागतात.

ओ. आवश्यकता भासल्यास निबंधक अधिकारी (रजिस्ट्रार) घरी येऊनही मृत्यूपत्र करू शकतो. त्याचे निराळे शुल्क आकारले जाते.

औ. साधारणपणे ५ ते ७ सहस्र रुपये एवढा व्यय आणि सरकारी शुल्क भरावे लागते.

अं. अनेकदा लोक केवळ ‘नोटराईज्ड’ मृत्यूपत्र करतात. त्यामुळे पुढे कार्यवाही करतांना अडचण येते; म्हणून गोवा येथे नोंदणीकृत मृत्यूपत्र करणे आवश्यक आहे. अजून तरी यासंदर्भात ‘ऑनलाईन’ सेवा चालू झालेली नाही.’

– अधिवक्ता शैलेश कुलकर्णी, कुर्टी, फोंडा, गोवा.