आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. आपल्या देशासाठी प्राणपणाला लावून काम करणार्या देशभक्तांचे आपल्याला नित्य स्मरण असले पाहिजे. अशा देशभक्तांच्या मांदियाळीतील विशेष परिचयात नसलेल्या भारतीय परराष्ट्र सेवेचे (‘इंडियन फॉरेन सर्व्हिस’चे) अधिकारी रवींद्र म्हात्रे यांचा परिचय करून देणे आवश्यक आहे.
१. रवींद्र म्हात्रे यांचा जन्म ते शिक्षण प्रवास
रवींद्र म्हात्रे हे काश्मीरमध्ये चालू झालेल्या आतंकवादात हुतात्मा झालेले भारतीय परराष्ट्र सेवेचे पहिले अधिकारी होते. त्यांचा जन्म २६ मे १९३५ या दिवशी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव हरेश्वर रामचंद्र म्हात्रे आणि आईचे नाव ताराबाई हरेश्वर म्हात्रे. प्रारंभापासून त्यांच्या वडिलांचे वास्तव्य मुंबईत चेंबूरला होते. लहानपणापासून अत्यंत हुशार म्हणून रवींद्र शाळेतील शिक्षकांचे लाडके विद्यार्थी होते. ते एकपाठी होते. आपल्या मित्रांचे सर्वांत लाडके होते. अभ्यासात मागे असणार्या मित्रांना ते शिकवत होते.
त्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम असली, तरी त्यांना साधे राहणीमान आवडत असे. ते निर्व्यसनी होते. कबड्डी, क्रिकेट आणि बुद्धीबळ हे त्यांचे आवडीचे खेळ होते. वर्ष १९५० मध्ये त्यांनी एस्.एस्.सी.ची (१० वीची) परीक्षा दिली. या परीक्षेत ते उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले. मराठी माध्यमातून शिक्षण घेणार्या रवींद्र यांचे इंग्रजी भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते. फ्रेंच विषयात बोर्डाच्या परीक्षेत ते दुसर्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यांना विविध भाषा शिकण्याची आवड होती. मराठी, हिंदी, इंग्रजी, फ्रेंच, पुश्तु, बंगाली, उर्दू , जर्मन, रशियन, जपानी अशा अनेक भाषांवर त्यांनी प्रभुत्व संपादन केले होते. उच्च विद्याविभूषित असूनही ते अत्यंत नम्र होते. ते ‘इंडियन फॉरेन सर्व्हिस’ या परीक्षेत प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. त्यांना शासकीय सेवेत नोकरीही मिळाली; पण ते कोणत्या पदावर काम करतात, हे त्यांनी कुणालाही सांगितले नाही.
२. रवींद्र म्हात्रे यांनी आतंकवादाच्या दबावाखाली असणार्या इस्लामी देशांमध्ये ‘भारतीय राजदूत’ म्हणून निर्भयतेने आणि प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडणे
एकदा ते त्यांच्या मित्रांसह सांताक्रूझ विमानतळावर असतांना तेथील कर्मचार्यांनी रवींद्र म्हात्रे यांना आदराने नमस्कार करून त्यांचे स्वागत केले. त्या वेळी त्यांच्या मित्राने विचारले, ‘‘तुला विमानतळावरील कर्मचारी एवढा मान का देतात ?’’ तेव्हा त्यांनी नम्रपणे मित्रांना सांगितले, ‘‘प्रमुख भारतीय राजदूत म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली आहे.’’ त्यांचे उर्दू भाषेवर प्रभुत्व असल्यामुळे बांगलादेश, पाकिस्तान, इराण, इराक यांसारख्या आतंकवादाच्या दबावाखाली असणार्या देशांमध्ये ‘भारतीय राजदूत’ म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. सर्व इस्लामी राष्ट्रांसह भारताचा सतत संघर्ष चालू होता. त्यामुळे इस्लामी राष्ट्रांतील भारतियांवर सतत जीवघेणी आक्रमणे होत होती. तेथील भारतीय नागरिकांचे वरचेवर अपहरण केले जात होते. या पार्श्वभूमीवर रवींद्र म्हात्रे यांची नेमणूक विविध इस्लामी राष्ट्रांमध्ये ‘भारतीय राजदूत’ म्हणून करण्यात आली होती. अशा विचित्र परिस्थितीत त्यांनी निर्भयतेने आणि प्रामाणिकपणे स्वतःचे कर्तव्य बजावले.
इराणमध्ये असतांना इराक विरुद्ध युद्ध चालू होते. त्या वेळी युद्धाची छाया सर्वत्र पसरलेली होती. घाबरलेल्या भारतियांनी मोठ्या संख्येने भारतात परतण्यासाठी विमानतळावर गर्दी केली. प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे तेथील यंत्रणा कोलमडून गेली. त्यामुळे भारतात येणारी काही विमाने रहित करावी लागली. अशा गोंधळलेल्या वातावरणात अधिकच घबराट निर्माण झाली. ही वार्ता रवींद्र म्हात्रे यांना कळताच ते क्षणाचाही वेळ न दवडता तातडीने विमानतळावर गेले आणि तेथील परिस्थिती नियंत्रणात आणली. तेथील भारतीय प्रवाशांना स्वतःच्या कार्यालयात निवारा दिला. त्या प्रवाशांमध्ये एक गर्भवती महिला असल्याचे कळताच त्यांनी तिची भेट घेऊन आपुलकीने चौकशी केली आणि तिला धीर दिला, तसेच तिची खणा-नारळाने ओटी भरण्याची व्यवस्था केली.
इस्लामी राष्ट्रांमध्ये वारंवार त्यांची नेमणूक केली जात होती; पण अचानक वर्ष १९८२ च्या ऑगस्ट मासात त्यांची नियुक्ती बर्मिंगहॅम (ब्रिटन) येथील भारतीय दूतावासात उपउच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली.
३. कोणत्याही दबावाखाली काम न करणारे रवींद्र म्हात्रे !
कुठेही कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली रवींद्र म्हात्रे यांनी कधीही काम केले नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे… ‘जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असतांना त्यांना एक अत्यंत महत्त्वाची धारिका (फाईल) हवी होती; पण ती त्यांच्या कर्मचार्यांना सापडत नव्हती. त्यामुळे नेहरू चिडले. ही गोष्ट रवींद्र म्हात्रे यांना कळताच ते पंतप्रधानांच्या कार्यालयात गेले आणि त्यांनी नेहरूंना शांत केले. ते मृदु स्वरात नेहरूंना म्हणाले, ‘‘सर, आपण काळजी करू नका. तुम्हाला हवी असलेली धारिका सापडेल आणि ती सापडली नाही, तरी कोणतीही अडचण येणार नाही; कारण तुम्हाला हवी असलेली धारिका मी १५ दिवसांपूर्वीच पूर्णपणे वाचली आहे. त्या धारिकेतील अक्षर न् अक्षर मला तोंडपाठ आहे.’’
हे ऐकताच पंतप्रधानांनी त्यांना हवी असलेली माहिती रवींद्र म्हात्रे यांच्याकडून घेतली. रवींद्र म्हात्रे पंतप्रधानांना माहिती देत असतांना त्यांच्या ‘स्टेनोग्राफर’ने ती सर्व लिहून घेतली.’ असे हे कर्तव्यदक्ष अधिकारी सर्वांचे लाडके होते. त्यांचा सरकारी अधिकारी म्हणून सर्वत्र दरारा होता.
४. पाकिस्तानने रवींद्र म्हात्रे यांच्या अपहरणाचे दायित्व आतंकवादी मकबूल भट याला देणे
रवींद्र म्हात्रे हे आतंकवाद्यांच्या मार्गातील मोठे अडसर होते. आपल्या देशात आतंकवादी कारवाया करण्याची योजना पाकिस्तानने हेतूतः आखली होती. आपण समोरासमोर युद्ध करून भारताला पराभूत करू शकत नाही, याची जाणीव पाकिस्तानला होती. वर्ष १९७१च्या युद्धात पाकिस्तानचा पराभव झाला. या युद्धात भारतीय सैनिकांनी ९९ सहस्र पाकिस्तानी सैनिकांना पकडून नि:शस्त्र केले होते. याचा वचपा काढण्यासाठीच भारतात आतंकवादी कारवाया घडवून आणण्याची योजना पाकिस्तानने आखली. त्याचाच एक भाग म्हणून रवींद्र म्हात्रे यांचे अपहरण करण्याचे कारस्थान रचले गेले. त्यांचे अपहरण करण्याचे दायित्व आतंकवादी क्रूरकर्मा मकबूल भट याला देण्यात आले.
५. मकबूल भटला फाशीची शिक्षा सुनावली जाणे; पण त्याने कारागृहातून पलायन करणे आणि पुन्हा तो एका हत्या प्रकरणात पकडला जाणे
याच मकबूल भटने काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी ‘जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट’ ही आतंकवादी संघटना स्थापन केली. त्याच्यासमवेत त्याचा औरंगजेब नावाचा एक सहकारी होता. आतंकवादी कारवाया करतांना पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत औरंगजेब मारला गेला. मकबूल भट मात्र पकडला गेला. त्याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली; पण श्रीनगरच्या कारागृहातून भुयार खणून तो पाकिस्तानात पळून गेला. तिथे त्याने पाकच्या सहकार्याने आपल्या देशाच्या विरोधात कारवाया चालू केल्या. वर्ष १९७१ मध्ये पाकने भारताचे एक विमान पळवले होते. त्या कटाचा सूत्रधार मकबूलच होता. पुन्हा वर्ष १९७४ मध्ये तो भारतात घुसला होता. वर्ष १९७५ मध्ये त्याने बांगेठ येथे एका अधिकोष व्यवस्थापकाची (‘बँक मॅनेजर’ची) हत्या करून बँक लुटली. या प्रकरणात तो पकडला गेला. न्यायालयाने त्याला कारावासाची शिक्षा ठोठावली. त्याला तिहारच्या कारागृहात हलवण्यात आले.
६. मकबूल भटसह अन्य १० जणांच्या सुटकेसाठी रवींद्र म्हात्रे यांचे अपहरण केले जाणे आणि आतंकवाद्यांनी त्यांची हत्या करणे
मकबूल भट आणि अन्य १० जणांची सुटका करण्याच्या हेतूने, तसेच जम्मू-काश्मीरच्या संदर्भातील अतिशय महत्त्वाची माहिती रवींद्र म्हात्रे यांच्याकडून उपलब्ध करून घेण्यासाठी त्यांचे अपहरण करण्यात आले. तो दिवस होता ३ फेब्रुवारी १९८४. त्यांचे अपहरण केल्याची एक चिठ्ठी एका वृत्तसंस्थेच्या कार्यालयात पोचवण्यात आली. त्या चिठ्ठीत ‘मकबूल भटसहित अन्य १० आतंकवाद्यांची सुटका आणि काही कोटी रुपये द्या’, अशा आशयाची मागणी करण्यात आली. ‘ही मागणी पूर्ण न केल्यास रवींद्र म्हात्रे यांना ठार मारण्यात येईल’, असेही त्या चिठ्ठीत लिहिले होते.
वास्तविक म्हात्रे यांचे अपहरण होतांना एकाने पाहिले होते; पण त्याने विशेष काही केले नाही. त्याने एका पोलिसाला जरी सांगितले असते, तरी ती मोटार अडवली गेली असती; पण त्याने तसे झाले नाही. अखेरीस मंगळवार, ५ फेब्रुवारी १९८४ या दिवशी रवींद्र म्हात्रे यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आल्याची वार्ता आकाशवाणीवरून सांगण्यात आली. ही घटना घडली, त्या वेळी इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान होत्या. त्यांनी रवींद्र म्हात्रे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांच्या आईचे सांत्वन केले. त्या वेळी इंदिरा गांधी म्हणाल्या, ‘‘आपला मुलगा कर्तव्यदक्ष अधिकारी होता.’’
७. तत्कालीन सरकारचा नाकर्तेपणा, बेपर्वाही आणि अनास्था यांमुळे रवींद्र म्हात्रे यांची हत्या होणे
या प्रकरणात इंदिरा गांधींनी लक्ष घातले आणि ११ फेब्रुवारी १९८४ या दिवशी मकबूल भटला तिहार कारागृहात फाशी देण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह तिहार कारागृहातच पुरण्यात आला. आपल्या देशाचे कर्तव्यदक्ष अधिकारी रवींद्र म्हात्रे तत्कालीन सरकारचा नाकर्तेपणा, बेपर्वाही आणि अनास्था यांमुळे ब्रिटनमध्ये आतंकवाद्यांकडून मारले गेले.
देशासाठी जीवावर उदार होऊन काम करणार्या या प्रशासकीय वरिष्ठ अधिकार्याच्या स्मृतीला विनम्र अभिवादन !
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली
(साभार : मासिक ‘सत्यवेध’, दिवाळी अंक, वर्ष २०२२)
संपादकीय भुमिकाआतंकवाद्यांचे मूळ असणाऱ्या पाकला नेस्तनाबूत करणे, हीच देशासाठी बलीदान दिलेल्या शुरांना आदरांजली ठरेल ! |