४ पत्नी असणे, हे अनैसर्गिक !

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून समान नागरी कायद्याचे समर्थन !

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (डावीकडे) असदुद्दीन ओवैसी (उजवीकडे)

भाग्यनगर (तेलंगाणा) – तुम्हाला असा एखादा इस्लामी देश ठाऊक आहे का ?, जेथे २ नागरी कायदे आहेत ? एखाद्या पुरुषाने महिलेशी लग्न केले, तर ते नैसर्गिक आहे; मात्र एका पुरुषाने ४ महिलांशी लग्न करणे, हे अनैसर्गिक आहे. मुसलमान समाजातील पुढारलेले आणि सुशिक्षित लोक ४ लग्न करत नाहीत. समान नागरी कायदा हा एखाद्या धर्माविरोधात नाही. हा कायदा देशाच्या प्रगतीसाठी आहे, असे सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी समान नागरी कायद्याचे समर्थन केले. ते ‘आज तक’ या हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ‘केंद्र सरकार समान नागरी कायदा देशभरात लागू करण्यासाठी कायदा का आणत नाही ?’ असा प्रश्‍न गडकरी यांना विचारण्यात आला होता. या प्रश्‍नाला उत्तर देतांना गडकरी यांनी हे विधान केले. ‘सध्या हा विषय चर्चेत असून राज्य सरकारांनी साथ दिली, तर या कायद्याचा देशभरातील लोकांना लाभ  होऊ शकतो’, असेही गडकरी यांनी सांगितले. त्यांच्या या विधानावर एम्.आय.एम्चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी टीका केली आहे.

(म्हणे) शबरीमला मंदिरात महिलांना प्रदेश देऊन दाखवा ! – असदुद्दीन ओवैसी यांचे गडकरी यांना आव्हान

महिलांना शबरीमला मंदिरात प्रवेश देण्यासाठी मी नितीन गडकरी यांना आव्हान देतो. तुमची ती संस्कृती आणि आमची संस्कृती नाही का?, अशी विचारणा असदुद्दीन ओवैसी यांनी यांनी केली. ते पुढे म्हणाले की, मुसलमान पत्नी या वैध पत्नी आहेत. त्यांना देखभाल खर्च आणि संपत्तीत वाटाही मिळतो. (असे आहे, तर शाहाबानो हिला पोटगी देण्यास मुसलमानांनी विरोध का केला ? तत्कालीन काँग्रेस सरकारवर दबाव आणून संसदेत कायद्यात पालट करून सर्वोच्च न्यायालयाचा आदेश का फेटाळला ? याचे उत्तर ओवैसी देतील का ? – संपादक)

संपादकीय भूमिका

ओवैसी यांनी प्रथम मुसलमान महिलांना मशिदीत प्रवेश देऊन दाखवावे, त्यांच्या पंथातील बुरखा, हिजाब आणि निकाह हलाला या प्रथा दूर करून दाखवाव्यात आणि मग बोलावे !