हिंगोली येथे गोतस्करांकडून पोलिसांवर दगडफेक !

  • प्रत्युत्तरात पोलिसांचा हवेत गोळीबार !

  • ५ तस्करांचे पलायन !

हिंगोली – वसमत-नांदेड मार्गावरील साई मंदिराजवळ गायींची तस्करी करणार्‍या ५ जणांच्या टोळीने १० डिसेंबरच्या पहाटे ५ वाजता गस्तीवर असलेल्या वसमत शहर पोलिसांच्या पथकावर दगडफेक केली.

१. वसमत पोलीस ठाण्यातील पोलिसांचे पथक गस्तीवर होते. पहाटे हे पथख वसमत पोलीस ठाण्यात येत होते. पोलिसांचे वाहन पहाताच एक मालवाहू चारचाकी वाहन भरधाव वेगात नांदेडकडे वळले. पोलिसांना संशय आल्यामुळे पोलिसांनी वाहनाचा पाठलाग केला.

२. गोतस्करांच्या वाहनचालकाने त्याचे वाहन नांदेड रस्त्यावरील साई मंदिराजवळ थांबवले. त्यामुळे पोलिसांनीही वाहन थांबून त्या वाहनाजवळ जाण्याचा प्रयत्न केला; मात्र त्या वाहनातील ५ जणांनी पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये पोलीस जमादार शिवाजी पतंगे घायाळ झाले.

३. प्रत्युत्तर म्हणून  पोलीस उपनिरीक्षक खार्डे यांनी हवेत गोळीबार केला. त्यामुळे तस्कर वाहनासह पळून गेले. भरधाव वेगातील तस्करांचे वाहन लिमगाव शिवारात उलटले. तेथून वाहनातील पाचही तस्करांनी पळ काढला. पोलीस त्यांच्या शोधात आहेत. पोलिसांना वाहनात ५ गायी आढळून आल्या.

४. आरोपींच्या वाहनावर समोरच्या बाजूने संभाजीनगर येथील वाहन क्रमांक, तर पाठीमागच्या बाजूने नांदेड येथील क्रमांक आहे. त्यामुळे ‘हे वाहन चोरीचे असावे’, असा पोलिसांना संशय आहे.

संपादकीय भूमिका

यावरून गोतस्करांना पोलिसांचा जराही धाक नसल्याचे दिसून येते !