खासदार रणजितसिंह निंबाळकर यांची लोकसभेत मागणी
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – मुळा-मुठा नदी राज्यातील सर्वांत प्रदूषित नदी असून नदीचे पाणी उजनी धरणात सोडले जात असल्याने उजनी धरणातील पाणी अधिक प्रदूषित झाले आहे. त्यामुळे ‘नमामि चंद्रभागा’ परियोजनेची प्रभावी कार्यवाही करण्याची मागणी भाजपचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी लोकसभेत केली.
या वेळी खासदार निंबाळकर म्हणाले की,
१. मुळा-मुठा नदीच्या काठावर अनेक औद्योगिक वसाहती असल्याने कारखान्यातील सांडपाण्याचा प्रवाह थेट नदी पात्रात येत असल्याने दुर्गंधी पसरत आहे. अनेक उद्योगांचे रसायन मिश्रीत पाणी नदीत सोडले जाते. प्रदूषित पाणी थेट चंद्रभागा नदीत, तसेच उजनी धरणात येत असल्याने धरणातील पाणी प्रदूषित झाले असून त्यावर तेलाचा तवंग निर्माण झाला आहे.
२. धरणातील पाणी सोलापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांना पिण्यासाठी, तसेच शेतीसाठी वापरले जात आहे. या प्रदूषित पाण्यामुळे लाखो नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. त्यामुळे केंद्रशासनाने ‘नमामि चंद्रभागा’ या योजनेतून चंद्रभागा नदीत थेट येणार्या पाण्याचे शुद्धीकरण करून ते पाणी नदीत सोडण्यात यावे.