पाकिस्तानकडे भाजीपाला खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत !

कराची – पाकिस्तान सरकार सध्या आर्थिक अडचणीत आहे. ‘देशाला भेडसावत असलेली अन्नपुरवठ्याची समस्या सोडवायची कि परकीय चलनाचा साठा वाचवायचा ?’, हे सरकारला ठरवणे कठीण जात आहे. त्यामुळे भाजीपाल्याने भरलेले शेकडो कंटेनर कराची बंदरात पडून आहेत.

पाकिस्तानच्या ‘द एक्सप्रेस ट्रिब्यून’ने दिलेल्या वृत्तानुसार १ कोटी ७० लाख डॉलर किमतीचे (३८० कोटी ८० लाख ४४ सहस्र पाकिस्तानी रुपये) कांद्याचे २५० कंटेनर, ८ लाख १६ सहस्र डॉलर (१८ कोटी २७ लाखांहून अधिक पाकिस्तानी रुपये) किमतीचे आले आणि २५ लाख डॉलर किमतीच्या लसूण (५६ कोटी पाकिस्तानी रुपये) यांनी भरलेले कंटेनर बंदरात पडून आहेत. तसेच ६ लाख टन सोयाबीनही अडकले आहे. देशातील बँका परकीय चलनाअभावी पतपत्रे (लेटर ऑफ क्रेडिट) देऊ शकत नाहीत. त्यामुळे भाज्यांनी भरलेले कंटेनर असेच पडून आहेत.

‘पाकिस्तान फ्रूट अँड व्हेजिटेबल एक्सपोर्टर्स इम्पोर्टर्स अँड मर्चंट असोसिएशन’चे सदस्य वाहीन अहमद यांच्या मते, पतपत्र (लेटर ऑफ क्रेडिट) देण्यास  विलंब झाल्यामुळे भाजीपाल्याच्या किमतीवर परिणाम होत आहे. कांदा घाऊक बाजारात १७५ रुपये किलो, तर किरकोळ बाजारात २५० ते ३०० रुपये किलो विकला जात आहे. ‘भाजीपालाही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाईल’, अशी चिंता ‘फेडरेशन ऑफ पाकिस्तान चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’चे कार्यवाहक अध्यक्ष सुलेमान चावला यांनी व्यक्त केली आहे.