पाच मिनिटांत ‘भगवद्गीता’ ग्रंथ लिहिण्याचा जागतिक विक्रम !

कराड, ७ डिसेंबर (वार्ता.) – येथील ‘शिक्षण मंडळ, कराड’च्या शताब्दी वर्षानिमित्त संस्थेच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने गीता जयंतीच्या दिवशी ४ माध्यमिक शाळांतील ७४० विद्यार्थ्यांनी अवघ्या पाच मिनिटांत भगवद्गीतेतील ७४० श्लोक लिहून जागतिक विक्रम केला.

प्रत्येक विद्यार्थ्याने गीतेतील एक श्लोक सुवाच्य हस्ताक्षरात लिहून नंतर क्रमाने अठरा अध्याय श्लोकांचे हे हस्तलिखित एकत्र करून भगवद्गीतेचा ग्रंथ शिक्षकांना प्रदान केला.

विद्यार्थ्यांचे सुवाच्य अक्षरातील हस्तलिखित श्लोक

भगवद्गीतेमधील श्लोक लिहितांना विद्यार्थी

संस्थेने हा अभिनव उपक्रम कै. अनंत श्रीधर भागवत यांच्या स्मृतीस समर्पित केला. कै. अनंत भागवत यांनी ७० वर्षे शाळेत भगवद्गीता शिकवली होती. त्यांच्या स्मरणार्थ शिक्षण मंडळाच्या वतीने आंतरराष्ट्रीय भगवद्गीता पाठांतर स्पर्धा घेतल्या जातात. शिक्षण मंडळ कराडच्या लाहोटी कन्या प्रशाला, टिळक हायस्कूल, एस्.एम्.एस्. इंग्लिश मीडियम आणि आत्माराम विद्या मंदिर यांच्या ७४० विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. या कार्यक्रमासाठी संस्थेचे शिक्षक काही मास परिश्रम घेत होते.

मान्यवरांकडे भगवद्गीता ग्रंथ प्रदान करतांना शाळेतील शिक्षिका

स्पर्धेचे आयोजन टिळक हायस्कूलच्या प्रांगणात करण्यात आले होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब कुलकर्णी, उपाध्यक्षा अनघा परांडकर, सचिव चंद्रशेखर देशपांडे, शिक्षण मंडळाचे विश्वस्त, शिक्षक आणि कर्मचारी वर्ग, मान्यवर, पालक, तसेच ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’चे प्रतिनिधी अशोक अडक उपस्थित होते. श्री. अडक यांच्या हस्ते शिक्षण मंडळाच्या पदाधिकार्‍यांकडे ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’चे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.