हिंदु धर्म आणि वास्तूशास्त्र यांमध्ये दिल्याप्रमाणे काही कामे सायंकाळच्या वेळी करू नयेत असे म्हटले असून याविषयी जाणून घेऊया.
१. नखे आणि केस कापणे
सूर्यास्तानंतर नखे आणि केस कापू नयेत. दाढी करणेही टाळावे. असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा रहाते. असे केल्याने घरावरील कर्ज वाढते, असे मानले जाते. (सकाळी स्नान करण्याच्या आधीच नखे आणि केस कापावेत. – संकलक)
२. झाडांना स्पर्श करणे किंवा पाणी देणे
असे मानले जाते की, सूर्यास्तानंतर कधीही झाडांना स्पर्श करू नये किंवा त्यांची पाने तोडू नयेत. रात्रीच्या वेळी त्यांना पाणीही देऊ नये. सूर्यास्तानंतर झाडे आणि वृक्ष हेही झोपतात.
३. कपडे धुणे आणि वाळवणे
सायंकाळी कपडे धुणे चांगले मानले जात नाही. एवढेच नाही, तर सायंकाळनंतर कपडे सुकवणेही चुकीचे मानले जाते. असे केल्याने आकाशातील सर्व नकारात्मक ऊर्जा कपड्यांमध्ये प्रवेश करते, असे म्हटले जाते.
४. अन्न उघडे ठेवणे
सूर्यास्तानंतर अन्न किंवा पाणी उघडे ठेवू नये. ते नेहमी झाकून ठेवावे. या गोष्टी उघड्याच राहिल्यास नकारात्मक ऊर्जा त्यात शोषली जाते, ज्यामुळे ते खाल्ल्याने व्यक्ती आजारी पडू शकते, असे म्हणतात.
५. दही किंवा भात खाणे
पुराणात सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन निषिद्ध मानले गेले आहे, तसेच सूर्यास्तानंतर भात खात नाहीत.
६. झाडणे
असे मानले जाते की, सूर्यास्तानंतर घर झाडू नये किंवा साफसफाई करू नये. असे केल्याने धनहानी होऊ शकते.
७. सायंकाळच्या वेळी झोपणे
सूर्यास्तानंतर लगेच झोपू नये, म्हणजे सूर्यास्तानंतरच्या संधी प्रकाशामध्ये. या वेळी लैंगिक संबंधही निषिद्ध मानले जातात. असे केल्याने पती-पत्नीच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो.
(साभार : ‘लोकमत न्यूज १८’ वृत्तवाहिनीचे संकेतस्थळ)