तुम्ही देशाला नष्ट कराल !

सर्वोच्च न्यायालयाने अवैध देशी दारूवरून पंजाबमधील ‘आप’ सरकारला फटकारले !

नवी देहली – तुम्ही देशाला नष्ट कराल. जर देशाची सीमा सुरक्षित नसेल, तर देश कसा चालेल ? तुम्हाला वाईट गोष्टींना लगाम घालायला हवा, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या सरकारला फटकारले. राज्यात देशी दारूमुळे अनेकांचा मृत्यू होत आहे. या संदर्भात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने सरकारला फटकारले. ‘स्थानिक पोलिसांचे दायित्व निश्‍चित करायला हवे. या संदर्भात विस्तृत प्रतिज्ञापत्र सादर करा’, असा आदेश न्यायालयाने दिला.

न्यायालयाने पुढे म्हटले की, अमली पदार्थ आणि दारू ही पंजाबमधील गंभीर समस्या आहे. सरकार केवळ गुन्हे नोंदवत आहे; परंतु राज्यातील प्रत्येक भागात दारूच्या भट्ट्या आहेत. हे अत्यंत भयावह आणि धोकादायक आहे. तुम्हाला जप्त करण्यात आलेल्या पैशांतून या संदर्भात जागृती अभियान राबवण्याची आवश्यकता आहे. एखाद्या देशाला नष्ट करायचे असेल, तर तो सीमेवरून चालू करणार नाही ? त्यामुळे पंजाबसारख्या सीमेवरील राज्यात होणे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. तरुणांना लक्ष्य करणे सोपे असते, त्यामुळे या संदर्भात अधिक सावध रहाण्याची आवश्यकता आहे.