कोल्हापूर जिल्ह्यात शहरासह विविध भागात गेल्या काही दिवसांपासून युवक-युवती यांच्या आत्महत्यांचे सत्र चालू आहे. या आठवड्यात करवीर तालुक्यातील एका गावातील २४ वर्षांच्या युवतीने ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. याच मुलीच्या बहिणीने २ वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. अन्य एका प्रकरणात अभियांत्रिकीची पदविका घेऊन चाकरी करणार्या २४ वर्षीय तरुणीच्या मामाचा मृत्यू झाल्याने आलेल्या नैराश्येतून तिने आत्महत्या केली. तिसर्या घटनेत कोल्हापूर शहरातील २५ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली. वास्तविक मनुष्यजन्म ही ईश्वराने आपल्याला दिलेली अमूल्य देणगी आहे. त्यामुळे कोणत्याही प्रसंगात खचून न जाता त्याला धैर्यानेच तोंड देणे अपेक्षित असते; मात्र शैक्षणिक अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना धर्मशिक्षण न दिल्याने मुलांना ‘आत्महत्या करणे, हे महापाप आहे’, हे समजत नाही, तसेच कमकुवत मनोबलामुळे आत्महत्येचा मार्ग स्वीकारला जातो.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना इंग्रजांनी काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली. कारागृहात असतांना कोलू फिरवणे, घंटोन्घंटे हातात बेड्या घालून उभे रहाणे यांसह अनेक यातनांना त्यांना सामोरे जावे लागले; मात्र अशा स्थितीतही त्यांच्या मनाला आत्महत्येचा विचारही शिवला नाही. काळकोठडीतही त्यांनी त्यांची प्रतिभा जिवंत ठेवली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनात, तर अफझलखान वध, औरंजेबाने कैद करणे, पुरंदरचा तह यांसह अनेक कठीण प्रसंग आले. यातील प्रत्येक प्रसंगावर मात करत छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यात यशस्वी झाले. छत्रपती शिवाजी महाराज भवानीमातेचा आशीर्वाद आणि संतांचे पाठबळ यांद्वारेच ते यशस्वी झाले.
शालेय वयातच मनाची जडघडण होत असल्याने विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच साधना, धर्म, अध्यात्म यांचे धडे मिळाल्यास त्यांचे मनोबल उंचावेल. विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात राष्ट्र-धर्माचा जाज्वल्य अभिमान असलेल्या राष्ट्रपुरुषांच्या चरित्रांचा समावेश हवा. आत्महत्येचे विचार येऊ नयेत आणि जरी ते विचार आले, तरी त्यावर मात कशी करायची ? मनमोकळेपणाने बोलणे, स्वभावदोषांवर मात करायला शिकवणे आदींसह आध्यात्मिक स्तरावरील काही गोष्टी शिकवायला हव्यात. असे झाल्यास कोणत्याही प्रकारचे अपयश अथवा प्रतिकूल प्रसंगांत खचून न जाता ईश्वराच्या साहाय्याने मात करता येईल. यासाठी सरकारने शिक्षणप्रणालीत पालट करावेत, हीच अपेक्षा !
– श्री. अजय केळकर, कोल्हापूर