जगातील सर्वांत प्रदूषित देशांमध्ये भारत ५ व्या क्रमांकावर !

स्वित्झर्लंडमधील आस्थापनाचा निष्कर्ष !

बांगलादेश पहिल्या, तर पाकिस्तान ३ र्‍या स्थानावर !

नवी देहली – हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवणार्‍या ‘आयक्यू एअर’  या स्वित्झर्लंडमधील ‘पोल्युशन टेक्नॉलॉजी कंपनी’ने जगातल्या प्रदूषित देशांची सूची सिद्ध  केली आहे. वर्ष २०२१ च्या अभ्यासावरून सिद्ध करण्यात आलेल्या या सूचीमध्ये भारत ५ व्या, तर बांगलादेश पहिल्या स्थानावर आहे. या सूचीमध्ये भारताची राजधानी देहलीसह देशातील अनेक प्रमुख शहरांची नावे आहेत.

ताझिकिस्तान ४ थ्या क्रमांकाचा सर्वांत प्रदूषित देश म्हणून समाविष्ट आहे. सिमेंट आणि कोळसा ऊर्जा प्रकल्पांमुळे तिथे सर्वाधिक वायुप्रदूषण होते. पाकिस्तान हा तिसर्‍या क्रमाकांचा सर्वांत प्रदूषित देश आहे. वायुप्रदूषणामुळे तेथील नागरिकांचे आयुर्मान ४ वर्षांनी अल्प झाले आहे. आफ्रिकेतला ‘चाड’ हा जगातल्या दुसर्‍या क्रमांकाचा प्रदूषित देश आहे. या देशात स्वच्छतेचा अभाव आणि कुपोषणानंतर वायुप्रदूषण ही तिसरी सर्वांत मोठी समस्या आहे. वर्ष २०१७ मध्ये या देशातल्या १४ सहस्र जणांचा वायुप्रदूषणामुळे मृत्यू झाला आहे.

संपादकीय भूमिका

विदेशी आस्थापनांनी सिद्ध केलेले अशा प्रकारचे अहवाल किती खरे असतात, याचाही आता शोध घेण्याची आवश्यकता आहे. पाश्‍चात्त्य देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते, हे जगजाहीर असतांना विकसनशील देशांना प्रदूषणासाठी जाणीवपूर्वक अशा प्रकारे लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे !