इस्रायली दिग्दर्शक लॅपिड यांच्या ‘कश्मीर फाइल्स’विषयीच्या विधानाला अन्य ३ परीक्षकांचे समर्थन !

नवी देहली – गोव्यामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आलेला ‘कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट अश्‍लाघ्य असल्याची टीका इस्रायलचे चित्रपट दिग्दर्शक आणि महोत्सवातील ५ सदस्यीय परीक्षक मंडळाचे अध्यक्ष नदाव लॅपिड यांनी केला होता. त्यावर टीका झाल्यानंतर त्यांनी क्षमाही मागितली होती; मात्र तरीही हे प्रकरण थांबलेले नाही. आता या महोत्सवातील परीक्षकांपैकी ३ परीक्षकांनी लॅपिड यांच्या विधानाचे समर्थन केले आहे. यापूर्वी ५ वे परीक्षक सुदीप्तो सेन यांनी त्यांचे या विधानाला समर्थन नसल्याचे स्पष्ट केलेले आहे.

परीक्षक मंडळावरील जिंको गोटोह यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, अशा कलात्मक महोत्सवात १५ व्या क्रमांकावर दाखवलेला ‘कश्मीर फाइल्स’ हा बटबटीत प्रचारी थाटाचा चित्रपट पाहून आम्हाला धक्का बसला. या महोत्सवात त्याचा समावेश अयोग्य होता. मी आणि अन्य दोघेजण (फ्रान्सचे चित्रपट निर्माते आणि पत्रकार जाव्हीर न्ग्युलो बार्तुरेन अन् फ्रेंच चित्रपट संकलक पास्कल चाव्हान्स) लॅपिड यांच्या मताशी सहमत आहोत. आमचे हे मत म्हणजे या चित्रपटात जे दाखवले आहे, त्यावरील राजकीय मत नाही, तर केवळ कलात्मक दृष्टीकोनातून मांडलेला विचार आहे. चित्रपट महोत्सवाच्या व्यासपिठाचा वापर राजकारणासाठी होणे आणि त्यानंतर नदाव यांच्यावर वैयक्तिक टीकेची आक्रमणे होणे, हे दु:खद आहे. आम्हा परीक्षकांचा तसा उद्देश नव्हता.

संपादकीय भूमिका

लॅपिड यांनी त्यांच्या विधानावरून क्षमा मागिल्यानंतर आता पुन्हा अशा प्रकारे अन्य ३ परीक्षकांनी म्हणणे म्हणजे हा एका मोठ्या षड्यंत्राचा भाग आहे, असेच वाटू लागले आहे ! याचा आता केंद्र सरकारने शोध घेणे आवश्यक आहे !