पंढरपूर विकास आराखड्यातील प्रस्तावित ‘कॉरिडॉर’ प्रकल्पाला वारकरी संप्रदायाचा विरोध !

पंढरपूर – श्री संत कबीर महाराज मठ या ठिकाणी २ डिसेंबर या दिवशी वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ फडकरी, दिंडीप्रमुख, मठाधिपती, संस्थानिक यांची बैठक पार पडली. यात पंढरपूर विकास आराखड्यातील प्रस्तावित ‘कॉरिडॉर’ प्रकल्पाला वारकरी संप्रदायाचा विरोध करण्याचा ठराव एकमताने संमत करण्यात आला. वारकरी संप्रदायाचा विकासाला विरोध नाही; मात्र पंढरपूरच्या विकास आराखड्याची कार्यवाही करतांना वारकरी संप्रदायाला विचारात घेण्यात आलेले नाही. त्यामुळे वारकरी संप्रदायाला विश्वासात घेऊनच आराखडा सिद्ध केला पाहिजे.  यासाठी आम्ही आग्रही आहोत, अशी भूमिका सर्वांनी मांडली.

‘पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती’ समवेत मिळून नवा विकास आराखडा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना लवकरच सादर करण्यात येईल. सद्यःस्थितीत या प्रकल्पास विरोध दर्शवण्यासाठी ५ डिसेंबरला दिंडी काढून शासनास निवेदन देण्यात येणार आहे, असे समस्त वारकरी-फडकरी दिंडी समाज संघटना, वारकरी संप्रदाय पाईक संघ, विश्व वारकरी संघ, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाज यांनी कळवले आहे.