भौतिक प्रगतीसह आध्यात्मिक शांततेसाठी अथर्वशीर्ष अभ्यासक्रमाविषयी माघार नाही ! – चंद्रकांत पाटील

पुणे – एका गल्लीत चार-चार गणपति मंडळे हवीत; मात्र त्यांचा शास्त्रीय अभ्यासक्रम का नको ? अथर्वशीर्ष अभ्यासक्रम हा शास्त्रीय अध्ययनाचा भाग असून केवळ राजकारण म्हणून विरोध नको. भौतिक प्रगतीसह आध्यात्मिक शांतता महत्त्वाची आहे. भारताचा आध्यात्मिक वारसा हा अभ्यास आणि संशोधन यांचा विषय असून नवतंत्रज्ञानासमवेतच तोही नव्या शैक्षणिक धोरणाचा आत्मा आहे. पूर्णतः ऐच्छिक असलेला हा अभ्यासक्रम निःशुल्क असून आमच्या आवडीच्या गोष्टी आम्हाला शिकण्याचा अधिकार आहे. विरोधकांनाही कोणता नवीन विषय शिकायचा असेल, तर त्यांनी सविस्तर अभ्यास करून तो विद्यापिठाकडे द्यावा. नवीन सूचनांचे स्वागत आहे; पण आता अथर्वशीर्षावरून माघार नाही, असे मत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. आंदोलन झाले; म्हणून अभ्यासक्रम मागे घ्यायची आवश्यकता नाही. नव्या सूचना स्वीकारा; पण अभ्यासक्रम बंद करू नका, असा सल्ला पाटील यांनी विद्यापिठाच्या कुलगुरूंना दिला.

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापिठात आयोजित इंडियन जिओटेक्निकल सोसायटीच्या (आय.जी.एस्.) अमृतमहोत्सवी वर्षाच्या बोधचिन्हाचे अनावरण झाले. या कार्यक्रमात ते बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि श्रीमंत दगडूशेठ गणपति मंदिर ट्रस्टने एक श्रेयांकाचा अथर्वशीर्ष अभ्यासक्रम चालू केला असून नुकतेच त्या संदर्भात वाद निर्माण झाले होते. त्यावर पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे.