अमरावती येथे इज्तेमाच्या काळात गोहत्या होऊ नयेत, याची काळजी प्रशासनाने घ्यावी ! – सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना, अमरावती

अमरावती, २ डिसेंबर (वार्ता.) – येथे २ ते ४ डिसेंबर या कालावधीत तबलिगी जमातीचा जिल्हास्तरीय इज्तेमा आयोजित केलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात गोवंश घेऊन जाणारी वाहने वाढली आहेत. याची पुराव्यासहित माहिती हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी वेळोवेळी प्रशासनाला दिलेली आहे. कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा उद्देश नाही; परंतु या इज्तेमाच्या दिवसांत गोहत्या आणि कत्तल होऊ नये, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, या आशयाचे निवेदन अमरावती येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना दिले.

या वेळी ‘पशूधन बचाओ संघटने’चे श्री. महेश देवळे, हिंदु गोरक्षा दलाचे श्री. अजय पॉल मोंगा, हिंदु हुंकार संघटनेचे श्री. सुधीर बोपुलकर, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे निषाद जोध, बजरंग दलाचे श्री. मयूर जयस्वाल, विश्व हिंदु परिषदेचे श्री. चेतन वाटणकर उपस्थित होते.

स्थानिक वृत्तपत्रातील वृत्तानुसार, पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी इज्तेमाच्या काळात शहरात कायदा-सुव्यवस्था राखावी, या हेतूने फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ कलम १४४ (१) (३) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जाहीर केले आहेत. त्यात ‘इज्तेमाच्या परिसरात ड्रोन कॅमेरा फिरणार नाही’, असा उल्लेखही करण्यात आलेला आहे. (असा आदेश हिंदूंच्या कार्याक्रमांच्या वेळी का काढला जात नाही ? – संपादक)