श्री क्षेत्र माणगाव येथील वर्ष २०२१ च्या दत्तजयंती निमित्त दैनिक ‘सनातन प्रभात’साठी विज्ञापने घेतांना साधकांना आलेल्या अनुभूती आणि त्यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

श्री क्षेत्र माणगाव (सिंधुदुर्ग) येथील प.प. वासुदेवानंद सरस्वती महाराज (टेंब्येस्वामी) दत्तमंदिर येथे प्रतिवर्षी दत्तजयंती साजरी केली जाते. वर्ष २०२१ च्या दत्तजयंतीनिमित्त दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक काढण्याचे नियोजन करण्यात आले होते. या विशेषांकासाठी विज्ञापने घेतांना विज्ञापन दात्यांकडून लाभलेला प्रतिसाद आणि माणगाव येथील साधकांनी अनुभवलेली गुरुकृपा यांविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.

श्री क्षेत्र माणगाव येथील दत्त मंदिर

१. श्री. हेमंत पावसकर

१ अ. दत्तजयंतीनिमित्त विशेषांकासाठी रंगीत विज्ञापने घेण्याचा निरोप मिळाल्यावर सकारात्मक रहाता येणे : ‘माणगाव येथील दत्तमंदिरात प्रतिवर्षी दत्तजयंती साजरी केली जाते. ‘या वर्षी दत्तजयंती निमित्त रंगीत विशेषांक काढायचा असून साधकांनी विज्ञापने मिळवण्यासाठी प्रयत्न करावा’, असा निरोप आम्हाला मिळाला. तेव्हा आम्हा सर्वांना सकारात्मक रहाता आले. खरेतर प्रतिवर्षी पुष्कळ प्रयत्न करून येथे केवळ कृष्णधवल विज्ञापनेच मिळतात.

१ आ. दळणवळण बंदीच्या काळात साधक व्यष्टी आढाव्याच्या सत्संगात सहभागी होत असल्याने त्यांच्यात संघभावना वाढणे : काही साधिकांनी यापूर्वी विज्ञापने घेण्याची सेवा कधी केली नव्हती किंवा काही जणी अध्यात्म प्रचारासाठीही कधी बाहेर पडल्या नव्हत्या. दळणवळण बंदीच्या काळात या साधिका ‘ऑनलाईन’ व्यष्टी आढावा सत्संगात नियमित सहभागी होत होत्या. त्यामुळे व्यष्टी साधना करतांना त्यांना आनंद अनुभवता येऊन त्यांच्यामध्ये संघभाव निर्माण झाला.

१ इ. वयस्कर साधकांनी विज्ञापने मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न : आरंभी वयस्कर साधक विज्ञापने मिळवण्यासाठी प्रयत्न करू लागले आणि त्यांना विज्ञापनेही मिळू लागली. त्यामुळे त्यांचा उत्साह वाढला. काही साधकांनी कोणताही पाठपुरावा न करता आपणहून विज्ञापने घेतली. यातून मला सौ. वनिता आर्डेकर (वय ७५ वर्षे), श्री. दत्ताराम कुडतरकर (वय ६२ वर्षे) आणि सौ. वनिता पावसकर (वय ६० वर्षे) या साधकांची तळमळ अनुभवता आली.

१ ई. परात्पर गुरु डॉक्टरांना तळमळीने प्रार्थना करून घरी राहून विज्ञापने मिळवणारे रुग्णाईत साधक श्री. उदय कोरगावकर (वय ६२ वर्षे) ! : श्री. उदय कोरगावकर हे गेली अनेक वर्षे रुग्णाईत असल्यामुळे अंथरुणावर झोपून आहेत. ते चाकांच्या आसंदीवरून (‘व्हीलचेअर’वरून) घरातल्या घरात फिरतात. ते व्यष्टी साधनेचे प्रयत्न नियमित करतात आणि त्याचा आढावाही देतात. ‘दत्तजयंती निमित्त विज्ञापने घ्यायची आहेत’, हे समजल्यावर त्यांनी ‘माझ्याकडून समष्टी सेवा करून घ्यावी’, अशी परात्पर गुरु डॉक्टरांना तळमळीने प्रार्थना केली. त्यानंतर त्यांनी नातेवाईक आणि आपली मित्रमंडळी यांची नावे काढून त्यांना संपर्क केला. या प्रयत्नांतून त्यांना विज्ञापने मिळाली आणि परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने समष्टी सेवेतील आनंदही अनुभवता आला.’

२. श्री. सदानंद पावसकर

२ अ. प्रार्थना करून सेवा करतांना ‘परात्पर गुरु डॉक्टर सतत समवेत आहेत’, असे अनुभवणे : ‘विज्ञापने आणतांना ‘कुणाकडे जायचे ?’, हे परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने मला सुचत होते. मी गुरुदेवांना ‘तुम्ही पुढे चला, मी तुमच्या मागून येतो’, अशी प्रार्थना करून सेवेला जात होतो. तेव्हा मी ज्यांच्याकडे जायचो, ती व्यक्ती पुष्कळ सकारात्मक असायची. मी सांगितलेले सर्व ऐकून घेऊन ती मला विज्ञापन द्यायची. त्यामुळे ‘गुरुदेव सतत माझ्या समवेत आहेत’, असे मला अनुभवता आले. या सेवेतून गुरुदेवांनी मला पुष्कळ आनंद दिला.’

३. श्रीमती शुभांगी सावंत (वय ६३ वर्षे)

३ अ. परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना करून प्रथमच विज्ञापने घेण्याची सेवा करणे आणि सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यामुळे आत्मविश्वास वाढून सेवेतील आनंद अनुभवणे : ‘मला यापूर्वी विज्ञापने घेण्याचा अनुभव नव्हता. व्यष्टी साधनेच्या आढावा सत्संगामुळे माझी समष्टी सेवेची तळमळ वाढली. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना करून मी प्रथम २ नातेवाइकांकडे विज्ञापने मागितली. त्यांनी होकार दिल्यावर माझा आत्मविश्वास वाढला आणि मला कृतज्ञताही वाटली. त्यानंतर मी समाजातील एका व्यक्तीला सनातन संस्थेचे कार्य सांगून विज्ञापन मिळवले. या सेवेतून गुरुदेवांनी मला आनंद दिला.

३ आ. साधना करण्याचा निश्चय होणे : सत्संगात सहभागी होत असल्याने आता ‘माझी संसारातील आसक्ती न्यून झाली आहे’, असे मी अनुभवत आहे. यापुढे ‘केवळ साधनाच करायची’, असा माझा निश्चय झाला आहे.’

४. श्री. दिगंबर काणेकर (वय ६४ वर्षे)

४ अ. परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना करून पुतणीला संपर्क केल्यावर मतभेद विसरून तिने विज्ञापन देणे : ‘मी गेली १२ वर्षांपासून काही वैयक्तिक मतभेदांमुळे माझ्या पुतणीशी बोलत नव्हतो. विज्ञापने घेण्याचे ठरल्यावर एकदम मला तिचे नाव सुचले आणि परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना करून मी तिला भ्रमणभाष केला. तेव्हा तिला पुष्कळ आनंद झाला. अनेक वर्षांनी आम्ही एकमेकांशी बोललो. आमच्यातील मतभेद संपुष्टात येऊन तिने मला विज्ञापनही दिले.

विज्ञापने घेण्याचा अंतिम दिवस झाल्यावरही विज्ञापने मिळण्याचा ओघ चालूच होता. ही गुरुकृपा अनुभवत असतांना ‘आम्ही केवळ निमित्तमात्र आहोत’, याची प्रचीती येऊन गुरुमाऊलींच्या चरणी सातत्याने माझी कृतज्ञता व्यक्त होत होती.’

५. विज्ञापनदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

५ अ. श्री. आनंद साधले : ‘श्री. आनंद साधले या विज्ञापनदात्यांनी ‘आम्ही तुमची वाट पहात आहोत’, असे सांगून आम्हाला विज्ञापन दिले आणि आमच्याकडून सनातन पंचांगही मागून घेतले.’ – श्री. सदानंद सावंत

५ आ. श्री. प्रसाद नार्वेकर : ‘श्री. प्रसाद नार्वेकर यांनी स्वतःहून ‘मी सनातन पंचांगासाठीही विज्ञापन देणार आहे’, असे सांगितले.’ – श्री. दत्ताराम कुडतरकर

कृतज्ञता

‘ही सेवा करतांना सर्व साधकांनी परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा अनुभवली. सर्वांना या सेवेतून आनंद आणि चैतन्य मिळाले. ‘गुरुदेवांनी आम्हा साधकांकडून ही सेवा करून घेतली’, यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’ – माणगाव (सिंधुदुर्ग) येथील साधक

(सर्व सूत्रांचा दिनांक २०.१२.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक