पुणे महापालिका मुख्य इमारतीतील महिलांसाठी स्थापन झालेला हिरकणी कक्ष गेल्या काही मासांपासून गायब !

हिरकणी कक्ष सर्व सुविधांनिशी तातडीने चालू करण्याचे ‘सजग नागरिक मंचा’चे अध्यक्ष विवेक वेलणकर यांचे प्रशासनास निवेदन

पुणे – येथील महापालिकेतील मुख्य इमारतीतील महिला कर्मचारी, तसेच महापालिकेत कामानिमित्त येणार्‍या महिला नागरीक यांच्यासाठी २०१६ या वर्षी गाजावाजा करून उभारण्यात आलेला हिरकणी कक्ष गेल्या काही मासांपासून गायब झाला आहे. या ठिकाणी स्तनदा मातांना बालकांना दूध पाजण्याची व्यवस्था, तसेच कुणा महिलेला बरे वाटत नसल्यास थोडा वेळ विश्रांती घेण्याची सोय होती. महापालिकेच्या मुख्य इमारतीतील तळमजल्यावर हा कक्ष उभारण्यात आला होता. काही मासांपूर्वी तिथे दिव्यांग कक्ष चालू करण्यात आला आणि हिरकणी कक्ष इमारतीतील तिसर्‍या मजल्यावरील काका वडके सभागृहाशेजारील खोलीत कागदोपत्री हालवण्यात आला; मात्र आता त्या नवीन जागेची पाहणी केली असता असे दिसून आले की, तेथे हिरकणी कक्षाचा बोर्डही नाही आणि व्यवस्थाही नाही.

त्या ठिकाणी मालमत्ता विभागाच्या धारिका पडल्या आहेत आणि त्या विभागाचे २ कर्मचारी तिथे काम करत आहेत. महापालिका प्रशासन आपल्याच महिला कर्मचारी आणि महिला नागरिक यांच्याविषयी किती संवेदनाशून्य आहे, हे यातून लक्षात येते, अशी खंत ‘सजग नागरिक मंचा’चे अध्यक्ष श्री. विवेक वेलणकर यांनी व्यक्त केली आहे. किमान आता तरी हा हिरकणी कक्ष सर्व सुविधांनिशी तातडीने चालू करून महिला कर्मचार्‍यांना दिलासा द्यावा, अशी विनंती त्यांनी प्रशासनास निवेदनाद्वारे केली आहे. (सार्वजनिक ठिकाणी, तसेच शासकीय, निमशासकीय कार्यालयात हिरकणी कक्ष बंधनकारक आहे. हा कक्ष सर्वांना सहज सापडेल, अशा ठिकाणी असणेही आवश्यक आहे. कार्यालयात कार्यरत असलेल्या आणि कामानिमित्त येणार्‍या महिलांची संख्या लक्षणीय आहे, असे असतांना हिरकणी कक्ष का चालू करण्यात आला नाही ? याचे कारणही प्रशासनाने शोधावे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

असे निवेदन का द्यावे लागते ? प्रशासन स्वतःहून यामध्ये लक्ष का देत नाही ?