दिब्रुगड (आसाम) येथे विद्यार्थ्यांकडून ५ मासांच्या गर्भवती शिक्षिकेशी गैरवर्तणूक : २२ विद्यार्थी निलंबित  

दिब्रूगड (आसाम) – येथील जवाहर नवोदय विद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी ५ मासांची गर्भवती असणार्‍या शिक्षिकेची छेड काढून गैरवर्तणूक केली. या शिक्षिकेने पालकांच्या बैठकीत यातील एका विद्यार्थ्याची त्याचा अभ्यास आणि आचरण यांविषयी तक्रार केली होती. त्या वेळी ही घटना घडली. या घटनेमुळे शाळेत गोंधळ झाल्यावर शाळेच्या प्रशासनाने पोलिसांना बोलावून परिस्थिती नियंत्रणात आणली. शाळेने या प्रकरणी २२ विद्यार्थ्यांना निलंबित केले आहे.


शाळेचे उपमुख्याध्यापक रतीश कुमार म्हणाले की, पालकांच्या बैठकीनंतर काही विद्यार्थ्यांनी तक्रार करणार्‍या शिक्षिकेला त्रास दिला. काही विद्यार्थ्यांनी शिक्षिकेला धक्काही दिला, तसेच त्यांचे केस ओढण्याचा प्रयत्न केला. या वेळी अन्य शिक्षिका, शाळेतील कर्मचारी आणि विद्यार्थिनी यांनी पीडित शिक्षिकेला विद्यार्थ्यांपासून वाचवले. या वेळी शिक्षिकेची प्रकृती बिघडल्याने तिला तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले. आम्ही या प्रकरणी शिक्षण विभागाला कळवले असून विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करण्यासही सांगितले आहे.

संपादकीय भूमिका

जे विद्यार्थी एका शिक्षिकेशी असे वागत असतील त्यांची शाळेतून हकालपट्टी करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे, तरच त्यांना अद्दल घडेल !