राज्यात ३ डिसेंबरपासून स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग कार्यरत होणार !

मुंबई – दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करण्याचा निर्णय २९ नोव्हेंबर या दिवशीच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यात ३ डिसेंबरपासून हा विभाग कार्यरत होणार आहे.

सध्या महाराष्ट्रात ३० लाखाहून अधिक दिव्यांग व्यक्ती आहेत. त्यांना सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभाग यांद्वारे दिव्यांगांना सेवा दिली जाते. या दोन्ही विभागांतील कार्यासने एकत्रित करून दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग निर्माण करण्यात येणार आहे. या विभागासाठी सचिव ते शिपाई पदापर्यंत २ सहस्र ६३ नवीन पदे निर्माण करण्यात येणार आहेत. यासाठी राज्यशासनाने २२० कोटी रुपये इतका निधी संमत केला आहे.