नृत्य करतांना भावविभोर होणार्‍या आणि नृत्यकलेतून दैवी आनंद अनुभवणार्‍या देहली येथील कथ्थक नृत्यांगना सौ. शोभना नारायण !

ऑक्टोबर २०२२ मध्ये महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, संगीत विशारद आणि संगीत समन्वयक) यांनी देहली येथील संगीताशी (गायन, वादन आणि नृत्य यांच्याशी) संबंधित २८ कलाकारांच्या भेटी घेतल्या. या निमित्ताने त्या कलाकारांच्या अंतरंगी असलेल्या संगीत साधनेचा अभ्यास करता आला. ‘४० – ५० वर्षांपेक्षा अधिक काळ संगीतासाठी वाहून घेतलेल्या या कलाकारांची ‘संगीत साधना’ पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरावी’, या उद्देशाने महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने या कलाकारांशी संवाद साधण्यात आला. या संवादातील काही भाग या लेखमालेच्या माध्यमातून आम्ही प्रकाशित करत आहोत. आजच्या भागात देहली येथील पद्मश्री विभूषित कथ्थक नर्तिका सौ. शोभना नारायण यांच्याशी झालेला संवाद पाहूया.

ईश्वरप्राप्तीसाठी संगीतयोग

१. पद्मश्री सौ. शोभना नारायण यांनी कलेविषयी व्यक्त केलेले मनोगत !

१ अ. ‘विविध देवता नृत्य, गायन किंवा वादन यांच्याशी संबंधित असल्यामुळे त्यातून ‘कला या ईश्वरप्राप्तीसाठीच आहेत’, असा संकेत मिळणे : ‘भारतातील सर्व कला या ईश्वरप्राप्तीचे विविध मार्ग आहेत. हिंदूंच्या देवतांकडे पाहिले, तरी हे लक्षात येते. भगवान शिव महायोगी आहे आणि उत्कृष्ट नर्तकही आहे. त्याच्या हातात डमरू आहे. तो मृदंगाच्या तालावर नृत्य करतो. पूर्वी त्याला ‘नृत्येश्वर’ म्हटले जायचे. आता त्याला ‘नटराज’ या नावाने संबोधले जाते. श्रीकृष्ण बासरी वाजवायचा. बासरीचे स्वर सगळ्यात शुद्ध आहेत. या स्वरांमुळे ईश्वराच्या आनंदस्वरूपाची अनुभूती येते. श्रीकृष्ण नर्तकही होता.

श्री सरस्वतीदेवीच्या हातात वीणा आहे. हिंदूंच्या देवतांना आपण कलेच्या रूपात पाहिले आहे. यातून ‘कला या ईश्वरप्राप्तीसाठीच आहेत’, असा एक मोठा संकेत मिळतो. यामुळेच कथ्थक या नृत्यकलेलाही भक्ती आणि ईश्वराच्या (आनंद) प्राप्तीचा मार्ग मानले आहे.

कथ्थक नृत्यांगना सौ. शोभना नारायण (उजवीकडे) यांच्या समवेत सुश्री (कु.) तेजल पात्रीकर

१ आ. कथ्थकचे उगमस्थान मंदिर असून ही एक दैवी कला असणे : कथा सांगतांना भावविभोर होऊन नृत्य करणार्‍या कलाकारांना ‘कथक कलाकार’, असे म्हटले जाते. अयोध्येमध्ये आजही कथा सांगून कथ्थक नृत्य करणारे आहेत. एकदा मी अयोध्येला गेले होते. तेव्हा या कलाकारांना पाहून माझ्या लक्षात आले, ‘या नृत्याचे मूळ बीज हे ‘कथक कलाकार’ असून यांच्यापासूनच ‘कथ्थक’ शब्द घेतला आहे. हे नर्तक (कथक) कथ्थकच्या माध्यमातून नृत्याराधना करणारे आहेत. त्यांच्या परंपरेतील मंदिरात केले जाणारे नृत्य आज रंगमंचावर केले जात आहे. ‘ईश्वराप्रती भाव कसा असायला हवा ?’, हे त्यांच्या कलेतून दिसून येते. त्यांच्या कलेचा उद्देश ‘गायन, वादन आणि नृत्य भावविभोर होऊन करणे अन् त्यातून ईश्वरप्राप्तीची अनुभूती घेणे’, हा आहे. मंदिरातील श्रोत्यांसमोर कथा सांगून कथ्थक नृत्य सादर करतांना नृत्य करणारे आणि श्रोते भावविभोर होतात. श्रोत्यांनाही या कलेतून ईश्वराचे दर्शन घडते. यातून ‘मंदिरात उगम पावलेली कथ्थक ही एक दैवी कला आहे’, हे लक्षात येते.

२. नृत्यसाधना करतांना सौ. शोभना नारायण यांना आलेल्या विविध अनुभूती

२ अ. नृत्य करतांना भावविभोर झाल्यामुळे नृत्य करतांना झालेल्या जखमेची जाणीव न होणे

२ अ १. नृत्य करतांना बिंदी सैल पडून डोळ्याजवळ टोचत राहिल्यामुळे तिथे जखम होऊन त्यातून रक्त येणे : एकदा मी देहली येथील एका सभागृहामध्ये नृत्य करत होते. मी नृत्य करतांना भावविभोर झाले होते. नृत्य करतांना माझी बिंदी थोडी सैल झाल्यामुळे ती सारखी माझ्या डोळ्याजवळ येऊन टोचत होती. थोड्या वेळाने तिथून ओघळ येऊ लागला. तेव्हा मला वाटले, ‘मला घाम आल्याने त्याचे थेंब चेहर्‍यावर ओघळत आहेत.’ ते पुसतांना ‘तो घाम नसून माझ्या डोळ्याजवळ जखम होऊन त्यातून रक्त येत आहे’, असे माझ्या लक्षात आले. नृत्य करतांना ‘मला जखम झाली आहे’, याची जाणीवही मला झाली नाही.

२ अ २. कधी कधी नृत्य करतांना पायांवर बांधलेल्या घुंगरांच्या घर्षणामुळे पायाची त्वचा सोलवटली जाऊन त्यातून रक्त यायचे; परंतु नृत्याशी एकरूप झाल्यामुळे मला त्याचे भानच नसायचे.

२ आ. कथक कलाकारांची कलाप्रस्तुती पाहून भावविभोर होऊन वेळेचे भान न रहाणे : एकदा कथ्थक नृत्यावरील संशोधन करण्यासाठी मी अयोध्येला गेले होते. मला वाटले, ‘कथक कलाकारांचे चित्रीकरण करून मी १० मिनिटांत परत येईन’; परंतु त्यांनी केलेले कथेचे सादरीकरण आणि कलाप्रस्तुती पाहून मी भावविभोर झाले आणि ‘एक घंटा कधी गेला’, ते मला कळलेही नाही.

२ इ. नृत्य करतांना मी दैवी जगतातील आनंद अनुभवू शकत होते. तो ईश्वरी आनंद होता.

कलाकारांनी भगवंताप्रतीचा भाव जागृत ठेवून कला सादर केली, तर रंगमंचावरही ईश्वराचे दर्शन होऊ शकते. कलेतून स्वतःला विसरून भौतिक जगाच्या पलीकडे गेले, तर कलाकारांना दैवी लोकात असल्याची अनुभूती घेता येते.’

– सौ. शोभना नारायण, कथ्थक नृत्यांगना, देहली (१७.१०.२०२२)

सौ. शोभना नारायण यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार !

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले संगीतावर करत असलेले वैज्ञानिक संशोधन अद्भुत !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या माध्यमातून आचार्य (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले) कलेतून ईश्वरप्राप्ती करण्याविषयी समाजात जागृती करत असून ते आताच्या काळानुसार लोकांना समजेल, अशा वैज्ञानिक भाषेत संगीताविषयी अद्भुत संशोधनकार्य करत आहेत.

२. ‘भावपूर्ण गायन किंवा वादन यांमुळे देवतांच्या चित्रातील सकारात्मक स्पंदने वाढतात’, हे फारच अद्भुत संशोधन असणे

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने एका संशोधनात्मक प्रयोगात ‘कलाकारावर नाट्यगृह (ऑडिटोरियम) आणि मंदिरातील किंवा संतांच्या आश्रमातील सात्त्विक वातावरण यांचा काय परिणाम होतो ?’, याचे वैज्ञानिक उपकरणांच्या साहाय्याने केलेले परीक्षण चांगल्या प्रकारे मांडले आहे. ‘भावपूर्ण गायन किंवा नृत्य यांमुळे देवतांच्या चित्रातील सकारात्मक स्पंदने वाढतात’, हे या संशोधनातून कळले. मला हे पुष्कळच अद्भुत आणि विशेष वाटले. ‘जगातील सगळ्यांनी हे संशोधन अवश्य पहावे आणि या संशोधनाचा मूळ उद्देश लक्षात घेऊन त्याचा अंगीकार करावा’, असे मला वाटते.

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी दिलेली दिशा समजून घेऊन त्या मार्गाने चालल्यास आनंदप्राप्ती होऊ शकणे

आपल्याला जीवनात आनंद हवा असतो आणि तो आनंद मिळवण्यासाठी आपण भौतिक गोष्टींचा विचार करतो; परंतु त्यातून अल्प कालावधीचाही आनंद मिळत नाही. खरेतर त्याला ‘आनंद’ म्हणताच येणार नाही. खरा आनंद दैवी असतो आणि तोच शाश्वत आनंद आहे. आपला अंतरात्मा याच शाश्वत आनंदाच्या शोधात असतो. खर्‍या आनंदाच्या प्राप्तीसाठी सतत प्रयत्नरत रहायला हवे.

‘आचार्यांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी) महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या माध्यमातून दिलेली दिशा समजून घेऊन आपण जीवनात हा मार्ग आचरणात आणायला हवा’, असे मला वाटते.’

– सौ. शोभना नारायण, कथ्थक नृत्यांगना, देहली (१७.१०.२०२२)

देहली येथील पद्मश्री विभूषित कथ्थक नर्तिका सौ. शोभना नारायण !

परिचय : पद्मश्री सौ. शोभना नारायण या एक प्रसिद्ध आणि मान्यवर कथ्थक नर्तिका आहेत. कथ्थक कलाकार अन् भारतीय लेखा परीक्षा आणि लेखा विभाग (‘इंडियन ऑडिट अँड अकाउंट्स डिपार्टमेंट’) येथे अधिकारी म्हणून अशी दुहेरी कारकीर्द त्यांनी केली. त्यांनी कथ्थक नृत्याचे शिक्षण कथ्थक केंद्र, देहली येथे पं. बिरजू महाराज आणि पंडित कुंदनलाल गंगाणी यांच्याकडून घेतले. त्यांनी अनेक नामांकित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवांत जगभरातील प्रेक्षकांसमोर नृत्यकला सादर करून त्यांना मंत्रमुग्ध केले आहे. त्यांनी अनेक कथ्थक नृत्य कलाकारांना प्रशिक्षण दिले असून त्यातील काही जण तरुण पिढीतील प्रमुख नृत्य कलाकार आहेत.

कथ्थक नृत्यकलाकार आणि गुरु म्हणून त्या सध्याच्या काळातील भारतातील सर्वांत प्रसिद्ध अन् उत्कृष्ट कथ्थक नृत्य कलाकारांपैकी एक आहेत. एक सृजनशील (नवीन निर्मिती करण्यासाठी लागणारी बुद्धीमत्ता, संवेदनशीलता आणि कल्पकता असलेली व्यक्ती) नृत्य दिग्दर्शक आणि नृत्य सादरकर्त्या कलाकार म्हणून त्या सुपरिचित आहेत. त्यांनी आतापर्यंत १६ पेक्षा अधिक पुस्तके, अनेक शोधनिबंध आणि ३०० पेक्षा अधिक लेख लिहिले आहेत. त्या पद्मश्री, संगीत नाटक अकादमी, इंदिरा गांधी प्रियदर्शिनी सन्मान इत्यादी ४० पेक्षा अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित आहेत. (१७.१०.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक