पुणे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले. याविषयी सर्वच स्तरांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही या वक्तव्याचा निषेध करत राज्यपालांच्या निषेधार्थ ३ डिसेंबर या दिवशी रायगडावर ‘जनआक्रोश’ करणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. शिवरायांचा अपमान करणार्यांवर कारवाई करायची नसेल, तर त्यांचे नाव घेण्याचा कुणाला अधिकार नाही, असे त्यांनी सांगितले.
उदयनराजे पुढे म्हणाले की, सर्वच पक्षांचा मूळ ‘अजेंडा’ हा ‘छत्रपती शिवरायांचे विचार आहेत.’ तसे नसेल तर शिवरायांचे नाव तरी का घेता ? भावी पिढीसमोर काय इतिहास ठेवणार ? चुकीचा इतिहास ठेवला, तर येणार्या पिढीला हाच इतिहास खरा वाटेल. राष्ट्रद्रोहाच्या कायद्यासह महापुरुषांचा अपमान होणार नाही, याविषयीही कायदा करावा. इतिहासासमवेत अशीच छेडछाड चालू राहिली, तर भारत देश जगातील सर्वांत मोठी लोकशाही असला, तरी तुकडे होण्यास किती वेळ लागणार आहे ?