भ्रमणभाषच्या अतीवापराने आरोग्य बिघडू देऊ नका !

प्रतिदिन रात्री झोपतांना उशिरापर्यंत अनेक लोक भ्रमणभाष पहात असल्याने ९३ टक्के नागरिकांमध्ये निद्रानाश आणि चिडचिडेपणा वाढला आहे. गेल्या २ वर्षांपासून अपुरी झोप आणि झोपेच्या वेळा निश्चित नसल्याने नैराश्य, तणाव अन् चिंता बळावल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. हे पाहिल्यानंतर लोकांचे मानसिक आरोग्य किती प्रमाणात बिघडले आहे, याची कल्पना येते. अशा प्रकारच्या व्यक्तींचे वैयक्तिक आणि सामाजिक जीवन कसे असेल ? याची कल्पनाच करता येत नाही. ‘जनतेचे मानसिक आरोग्य चांगले असेल, तरच देशाचा विकास खर्‍या अर्थाने झाला’, असे म्हणू शकतो.

संभाजीनगर येथील मानसशास्त्रज्ञ तथा समुपदेशक आधुनिक वैद्य संदीप सिसोदे म्हणाले, ‘‘अनुमाने ५ टक्के लोकांमध्ये झोपेसंबंधी आजार असल्यास त्यापैकी फक्त २ टक्के लोक याविषयी वैद्यकीय उपदेश घेतात. हे गंभीर असून आताच लोकांनी सावध व्हावे.’’ जालना येथील मानसोपचारतज्ञ आधुनिक वैद्य सूरज सेठिया म्हणाले, ‘‘भ्रमणभाष हे व्यसन ठरत आहे. सतत भ्रमणभाष वापरल्यामुळे ‘स्क्रीनटाईम’ वाढून झोप घटत आहे आणि मानसिक आजार जडत आहेत. भीतीने लोक आधुनिक वैद्यांकडे जात नाहीत.’’ जनतेला या गोष्टींचे ज्ञान नसल्यामुळे मानसिक आजारांवर उपाययोजना असूनही त्या लोकांपर्यंत पोचत नाहीत, ही अजूनच गंभीर आणि चिंताजनक आहे.

कोरोनाच्या काळात ‘ऑनलाईन’ शिक्षण घेतांना विद्यार्थ्यांना भ्रमणभाषचा अनावश्यक वापर करायची सवय लागली. यामध्ये विनाकारण व्हिडिओ पहाणे, सामाजिक माध्यमांतील ‘ॲप’वर इतरांशी चॅटिंग (संवाद) साधणे यांचे प्रमाण पुष्कळ वाढले. लहान मुले बराच वेळ भ्रमणभाषवर गेम खेळत असल्याने त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही मोठा परिणाम झाला. त्यामध्ये खेळामध्ये विजय प्राप्त न झाल्यास अनेक मुलांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊलही उचलले आहे. काहींनी भ्रमणभाषवर खोट्या लिंक पाठवून त्यामधून लोकांची आर्थिक फसवणूकही केली.

हे सर्व पहाता विज्ञानाने केलेल्या सोयीसुविधांचा वापर योग्य पद्धतीने करण्यासाठी मनुष्याचा विवेक जागृत असणे किती आवश्यक आहे, हे वरील उदाहरणांतून लक्षात येते. व्यक्तीचे मानसिक आरोग्य चांगले असेल, तरच तो अनेक गोष्टी करू शकतो. मानसिक स्थितीच नीट नसेल, तर अन्य गोष्टी असून नसून सारख्याच आहेत. यातून मानसिक स्वास्थ्यासाठी अध्यात्माची कास धरणे अनिवार्य आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध होते !

– श्री. सचिन कौलकर, मुंबई