मुंबई, २८ नोव्हेंबर (वार्ता.) – पर्यटन विकासाचा समन्वय आणि सनियंत्रण साधण्यासाठी सर्व जिल्ह्यांत जिल्हा समन्वयक नियुक्त करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, नगर परिषद आदी विविध विभागांशी संबंधित माहिती एकत्रित करून शासनाला सादर करण्याचे काम जिल्हा समन्वयक करणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) हे पर्यटन अधिकारी म्हणून काम पहाणार आहेत. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर, चंद्रपूर, जळगाव, धाराशिव, नांदेड, बुलढाणा आणि गोंदिया या जिल्ह्यात विनाशासकीय व्यक्तीची साहाय्यक पर्यटन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याविषयी २८ नोव्हेंबर या दिवशी शासन आदेश काढण्यात आला आहे.