सीमाप्रश्नामुळे महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांतील बससेवा विस्कळीत !

सोलापूर – महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाचा वाद चालू असल्याने नगरहून गाणगापूरकडे जाणारी १ बस कर्नाटकच्या सीमेवर थांबवण्यात आली होती. या बसमध्ये ४८ प्रवासी होते. त्यामुळे अनेक प्रवाशांना ताटकळत बसावे लागले. दोन्ही राज्यांतून ये-जा करणार्‍या बस काही काळ थांबवण्यात आल्या होत्या. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली आणि सोलापूर येथील काही भागांवर दावा सांगितल्यामुळे महाराष्ट्रातील विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत. या सूत्रावरून होणार्‍या आंदोलनांमुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारी, तसेच कर्नाटकातून महाराष्ट्रात येणारी एस्.टी. बसची सेवा तात्पुरती बंद करण्यात आली होती. दोन्ही राज्यांतील तणावाचे वातावरण निवळेपर्यंत बससेवा विस्कळीत राहील, अशी माहिती राज्य परिवहन अधिकार्‍यांच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे.