शिखर शिंगणापूर (सातारा) येथे आढळला शहाजीराजे यांचा शिलालेख !

शिखर शिंगणापूर (सातारा) – येथील महादेव मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूने तटबंदी आहे. या तटबंदीला अनेक खांब आहेत. त्यातील एका खांबावर कोरीव शिलालेख आढळला आहे. हा निजामशाहीच्या कारकीर्दीतील असून, शहाजीराजे आणि तुका गोविंदा असा उल्लेख असल्याचे आढळून आले आहे. शिलालेख खोदीव स्वरूपाचा असून ५ ओळींचा शुद्ध मराठी भाषेतील आहे. अक्षरांची वळण जुन्या मराठी भाषेतील फारशी मिश्रित आहे. या ओवरीत एक घंटा असून, त्यावर एक शिलालेख कोरलेला आहे. त्यावर ‘हर हर महादेव, रामजी कोडोबा वाग्या तुरुबेंकार’ असा उल्लेख आहे.


शिलालेखाचा अर्थ

शालिवाहन शकाच्या शके १५७६ व्या वर्षी जय सवंत्सर श्रावण शुद्ध पाडीवा म्हणजेच मंगळवार, ४ जुलै १६५४ या दिवशी फर्जंद महाराजा शहाजीराजे यांच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी श्रावणामध्ये होणार्‍या यात्रेमध्ये भोसले घराणे कुलदैवत शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव मंदिराच्या भोवती असणार्‍या तट भिंतीत काही खोल्या किंवा ओवर्‍या यांचे रुंद आणि मोठे असे बांधकाम तुका गोविंदा यांच्या हस्ते करवून घेतले किंवा त्याचा जीर्णोद्धार केला.