आखाती देशांतून पी.एफ्.आय.ला केला जात होता अर्थपुरवठा !

पी.एफ्.आय.च्या जिहादी सदस्यांवरील आरोपपत्रातील माहिती

पैसा गोळा करण्यासाठी निर्माण केली होती संघटित यंत्रणा !

नवी देहली – बंदी घालण्यात आलेली जिहादी आतंकवादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाला (पी.एफ्.आय.ला) आखाती देशांतून अर्थपुरवठा केला जात होता, अशी माहिती अंमलबजावणी संचालनालयाने येथील पटियाला हाऊस न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात दिली आहे. अर्थपुरवठा होण्यासाठी पी.एफ्.आय.कडून आखाती देशांमध्ये संघटित यंत्रणा निर्माण करण्यात आली होती, अशी माहितीही या आरोपपत्रात देण्यात आली आहे.

१. पी.एफ्.आय.ने देशविघातक कारवायांसाठी देश आणि विदेशातील संस्था आणि व्यक्ती यांचे जाळे निर्माण केले होते. त्यांच्या माध्यमातून मिळणारा पैसा पी.एफ्.आय.च्या बँकांमध्ये दान म्हणून गोळा केला जात होता. यानंतर या पैशांचा वापर कारवायांसाठी केला जात होता.

२. परवेज अहमद, महंमद इलियास आणि अब्दुल मुकीत यांच्या विरोधात हे आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. यांतील अहमद हा देहली शाखेचा अध्यक्ष आहे आणि तो गोळा होणार्‍या पैशांवर लक्ष ठेवत होता. तसेच जनसंपर्काचेही काम करत होता. महंमद इलियास देहलीतील सरचिटणीस होता आणि तो या भागात पैसे गोळा करण्याचे काम करत होता. त्याने पी.एफ्.आय.ची राजकीय शाखा असलेल्या सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचा उमेदवार म्हणून देहली विधानसभेची निवडणूकही लढवली होती. अब्दुल मुकीत हा देहली कार्यालयाचा सचिव होता आणि तो देणगीच्या खोट्या पावत्या बनवत होता.

संपादकीय भूमिका

आखातातील इस्लामी देश भारतात हिंदूंच्या विरोधात जिहादी कारवाया करण्यासाठी येथील जिहादी संघटनांना अर्थपुरवठा करतात, हे लक्षात घ्या ! अशा देशांच्या विरोधात भारताने आता कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे !