बलात्कार्‍याला भर चौकातच फाशी द्या !

‘जर बलात्कारांच्या प्रकरणातील दोषींना सार्वजनिक ठिकाणी फासावर लटकवले, तर इतर कुणीही असा गुन्हा करतांना १ सहस्र वेळा विचार करील’, असे विधान मध्यप्रदेशच्या सांस्कृृतिक मंत्री आणि भाजप नेत्या उषा ठाकूर यांनी केले. सद्यःस्थितीला प्रतिदिनच बलात्काराच्या असंख्य घटना घडत आहेत. शिशुवर्गातील बालिकेपासून ते ५०-६० वर्षे वयाच्या वृद्ध महिलाही या अत्याचाराला बळी पडत आहेत. वृत्तपत्रांतून, पोलीस तक्रारींतून प्रकाशात येणारी प्रकरणे जशी आहेत, तशीच भीतीपोटी अशा घटना लपवून त्यावर पडदा टाकणारेही आहेत. यामुळे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात सहभागी असलेले गुन्हेगार मोकाट फिरत आहेत. हे अतिशय संतापजनक आणि गंभीर आहे.

मुळात कायदा किंवा गुन्ह्यासाठी होणारी शिक्षा यांचे भय गुन्हेगारांमध्ये नाही. गुन्हेगारांच्या मनात शिक्षेची जरब निर्माण होण्यासाठी बलात्कार्‍याला कठोर शिक्षा आणि शिक्षेची प्रभावी कार्यवाही होणे आवश्यक आहे. यादृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील एक प्रसंग अतिशय उद्बोधक आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी केवळ १५ वर्षांचे असतांना रांझे गावच्या पाटलाने एका महिलेवर बलात्कार करून तिला मारून टाकल्यामुळे त्या पाटलास चौरंग करण्याची शिक्षा दिली. चौरंग म्हणजे दोन्ही हातपाय तोडणे आणि डोळे फोडून चौकात टांगणे. छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ वयाच्या १५ व्या वर्षी एका बलात्कार करणार्‍याला एवढी भयंकर शिक्षा का दिली ? हे आताच्या घडणार्‍या बलात्काराच्या घटनांवरून लक्षात येते.

त्या काळात अनेक मोगल सैनिक हिंदु स्त्रिया आणि मुली यांना पळवून नेऊन त्यांच्यावर बलात्कार, अत्याचार करत असत. कुणीही यावे आणि उचलून नेऊन बलात्कार करावा, विटंबना करावी अशी परिस्थिती होती. त्या काळी पाटलाला कठोर शिक्षा दिल्यामुळे महाराष्ट्रातील लोकच काय पण तरुण सैनिक, शत्रू सैन्यही महिला आणि मुलींवर बलात्कार करण्यापूर्वी शंभरदा विचार करत होते. सद्यःस्थितीत भारत बलात्कार्‍यांचा देश होऊ लागला आहे. त्यामुळे प्राप्त बिकट परिस्थितीवर मात करण्यासाठी कठोरपणे दंडात्मक कारवाई होणे क्रमप्राप्त आहे; म्हणूनच सांस्कृृतिकमंत्री उषा ठाकूर यांनी केलेली उपरोक्त मागणी कुणालाही योग्यच वाटणार. यासाठी स्त्रीशक्ती जागृत झाल्यास ती काय करू शकते ? हे इतिहासाने आपल्याला शिकवले आहेच. त्यामुळे स्त्रियांनो उठा आणि स्वतःच्या रक्षणासाठी सिद्ध व्हा !

– श्रीमती धनश्री देशपांडे, गोवा.