मंगळुरूतील स्फोटामागे जिहादी आतंकवादी !

कर्नाटकच्या पोलीस महासंचालकांनी दिली माहिती !

मंगळुरू (कर्नाटक) – येथे १९ नोव्हेंबरला एका रिक्शात स्फोट होऊन आग लागली होती. यात रिक्शाचालक आणि अन्य एक असे दोघे जण होरपळले होते. या घटनेचे सीसीटीव्ही चित्रणही सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले होते. घटनेनंतर पोलीस आयुक्त एन्. शशीकुमार यांनी ही आगीची घटना असल्याचे म्हटले होते. आता याविषयी पोलीस महासंचालकांनीच खुलासा केला आहे. ते म्हणाले, ‘‘रिक्शात झालेला स्फोट हा सामान्य स्फोट नसून हे आतंकवादी आक्रमण होते. या स्फोटामुळे अधिक हानी झाली नसली, तरीही मोठी हानी करण्याच्या उद्देशानेच हे आक्रमण करण्यात आले होते.’’

१. कर्नाटकचे गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र म्हणाले की, ही घटना आतंकवादी कृत्य असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. राज्य पोलीस आता केंद्रीय अन्वेषण यंत्रणांच्या साहाय्याने या प्रकरणाचे सखोल अन्वेषण करत आहेत.

२. सूत्रांच्या माहितीनुसार एका प्रवाशाने रिक्शात ठेवलेल्या बॅगेत स्फोटके असल्याचा दावा केला जात आहे. गुप्तचर विभाग आणि राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा स्थानिक पोलिसांना अन्वेषणासाठी साहाय्य करत आहे. कर्नाटक पोलिसांनी याच्या अन्वेषणासाठी एक विशेष अन्वेषण पथक स्थापन केले आहे.

३. गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक आणि तमिळनाडू येथे आतंकवादी मोठ्या आक्रमणाच्या सिद्धतेत आहेत. तमिळनाडूच्या कोइम्बतूर येथे चारचाकीमध्ये झालेल्या स्फोटाच्या अन्वेषणातून ही माहिती समोर आली होती. ‘कोइम्बतूर आणि आताचा मंगळुरू येथील स्फोट यांच्यात काही संबंध आहे का ?’, याचे अन्वेषण केले जात आहे. कदाचित् दोन्ही स्फोटांच्या मागे एकच सूत्रधार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संपादकीय भूमिका

  • भारतात जिहादी आतंकवादी कारवाया करण्यामागे असणारी जिहादी मानसिकता नष्ट करण्यासाठी भारताने आता युद्धपातळीवर प्रयत्न करणे आवश्यक !
  • पोलिसांनी केवळ माहिती देणे नव्हे, तर या आतंकवाद्यांच्या मुसक्या आवळून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित !