सातारा, १९ नोव्हेंबर (वार्ता.) – स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १७ आणि १८ नोव्हेंबर या दिवसांसाठी राज्यभर आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाला सातारा जिल्ह्यातील कराड येथे हिंसक वळण लागले. कराड तालुक्यातील इंदोली येथे मध्यरात्री अज्ञाताने उसाचा ट्रॅक्टर पेटवून दिला. त्यामुळे ऊस दरासाठीचे आंदोलन चिघळले आहे. साखर कारखानदारांनी विनाकपात एकरकमी एफ्.आर्.पी. द्यावी, हंगाम संपल्यानंतर ३५० रुपये द्यावेत, अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या राज्यव्यापी आंदोलनात सहभागी होत शेतकर्यांनी २ दिवस ऊस तोड करू नये, ऊस वाहतूक करू नये, असे आवाहन केले; मात्र ऊस वाहतूक होत असल्यामुळे अज्ञाताकडून मध्यरात्री ट्रॅक्टर पेटवून देण्यात आला. कराड तालुक्यातील वाठार येथे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखून धरली होती. पोलिसांनी मध्यस्ती केल्यानंतर पोलीस बंदोबस्तामध्ये ऊस वाहतूक चालू करण्यात आली.