आजीवन हिंदु होते गौतम बुद्ध !

‘आपल्या देशाचे अनेक बुद्धिजीवी एका भ्रमाचे बळी ठरलेले आहेत. त्यांना वाटते की, गौतम बुद्धांसमवेत भारतात एका नवीन धर्माचा प्रारंभ झाला आणि तो हिंदु धर्माच्या विरोधातील ‘विद्रोह’ होता. अजून एक संपूर्ण गोष्ट कपोलकल्पित आहे की, बुद्ध यांनी जातीभेद नष्ट केले आणि एका समाजमूलक दर्शनाची किंवा समाजाची स्थापना केली. जर बुद्धांना जाती प्रथेशी विद्रोह करायचा असता किंवा नवीन मार्ग निर्माण करायचा असता, तर त्यांनी सामाजिक आणि जातीय परंपरा यांचा तिरस्कार करायला सांगितले असते. त्यांनी असे काहीही केले नाही आणि कधीच केले नाही.

१. गौतम बुद्धांसमवेत भारतात नवीन धर्माचाप्रारंभ होऊन तो हिंदु धर्माच्या विरोधातील ‘विद्रोह’ असल्याचा पसरवण्यात आलेला भ्रम ! 

काही डाव्या विचारांच्या लेखकांनी तर कार्ल माक्स हे पूर्वजन्मीचे गौतम बुद्ध असल्यासारखे दाखवण्याचा प्रयत्न केला. ज्यावरून त्यांना वर्गविहीन समाज बनवण्याचा विचार गौतम बुद्धांपासूनच चालू झाल्याचे म्हणायचे आहे इत्यादी. गौतम बुद्धांचे जीवन, विचार आणि कार्य यांवर संपूर्ण दृष्टी टाकली, तर त्यांच्या जीवनात असा एकही प्रसंग आढळून येत नाही की, त्यांनी वंश आणि जाती-व्यवहार यांची अवहेलना करण्यास सांगितले असेल. उलट जेव्हा जेव्हा गौतम बुद्धांचे मित्र किंवा अनुयायी यांना अडचणींचे प्रसंग आले, तेव्हा बुद्धांनी स्पष्टपणे पूर्वापार चालत आलेल्या चालीरितींचा सन्मान करण्यास सांगितले.

एकदा गौतम बुद्ध यांचे मित्र प्रसेनादी याला समजले की, त्याची पत्नी संपूर्ण शाक्य नाही, तर एका दासीपासून जन्मलेल्या शाक्य राजाची पत्नी आहे. तेव्हा त्याने तिचा आणि तिच्यापासून झालेल्या मुलाचा त्याग केला. हे समजल्यावर गौतम बुद्ध यांनी त्यांच्या मित्राला समजावले आणि त्याला निर्णय मागे घ्यायला लावला. या वेळी बुद्धांनी सांगितले की, ‘परंपरेने मुलाची जात पित्याच्या आधारे ठरवली जाते. त्यामुळे शाक्य राजाची मुलगी शाक्यच आहे.’ गौतम बुद्ध यांचा हा व्यवहार सुसंगत होता.

यावर प्रसिद्ध विद्वान डॉ. कॉनराड एल्स्ट यांनी अतिशय महत्त्वपूर्ण सूत्र सांगितले आहे. ते म्हणतात की, ‘ज्याला या जगाला आध्यात्मिक शिक्षण द्यायचे असेल, तो सामाजिक प्रश्नांमध्ये फार अल्प लक्ष घालेल. एखादी क्रांती करणे, नवीन राजकीय आणि आर्थिक उपक्रम चालवणे तर फार लांबची गोष्ट राहिली !’ एल्स्टच्या मते, ‘एखाद्या मनुष्यासाठी त्याच्याच साधारण इच्छा पूर्ण करणे एक कठीण काम असते. तेव्हा एखाद्या काल्पनिक समानतावादी समाजाच्या अंतहीन इच्छा पूर्ण करायचे ठरवणे, ही किती अंतहीन भटकंती असेल !’

२. गौतम बुद्धांच्या निवडक शिष्यांमध्ये जवळपास अर्धे शिष्य ब्राह्मण  

डॉ. शंकर शरण

गौतम बुद्धांना आध्यात्मिक संदेश द्यायचा असता, तर हे पटण्यासारखे असते की, त्यांनी सामाजिक, राजकीय आणि आर्थिक व्यवस्थांमध्ये कमीतकमी लक्ष घातले असते. त्यांची चिंता ‘ब्राह्मणवादाच्या विरुद्ध बंड’, राजकीय कार्यक्रम इत्यादी नव्हतीच, जे आताचे मार्क्सवादी, नेहरूवादी किंवा आंबेडकरवादी त्यांच्यात पहात असतात. त्यामुळे स्वभावत: बुद्धांच्या निवडक शिष्यांमध्ये जवळपास अर्धे लोक ब्राह्मण होते. त्यांच्या मधूनच अधिकांश प्रखर दार्शनिक पुढे आले, ज्यांनी काळानुसार बौद्ध दर्शन आणि ग्रंथ यांना महान चिंतन अन् सखोल तर्कप्रणालीचा पर्याय बनवला.

३. गौतम बुद्ध यांनी प्राचीन ज्ञान, परंपरा किंवा धर्म यांच्या विरोधात कोणताही नवीन प्रारंभ न करणे     

हेही खरे आहे की, भारतातील महान विश्वविद्यालये गौतम बुद्धांच्या पूर्वीपासूनच आहेत. तक्षशिलाचे प्रसिद्ध विश्वविद्यालय गौतम बुद्ध यांचे अवतरण होण्यापूर्वीपासून होते. त्यात बुद्धांचे मित्र बंधुला आणि प्रसेनादी शिकले होते. काही विद्वानांच्या मते, स्वत: सिद्धार्थ गौतमही तेथे शिकले होते. त्यामुळे असे म्हणणे योग्य ठरेल की, बुद्धांनी त्याच संस्थांना अधिक सबळ केले, ज्या त्यांना हिंदु समाजाकडून आधीच मिळाल्या होत्या. नंतर बौद्ध विश्वविद्यालयांनी आर्यभट्टसारख्या अनेक अबौद्ध शास्त्रज्ञांनाही प्रशिक्षित केले. त्यामुळे वास्तविक चिंतन, शिक्षण आणि लोकाचार यांमध्ये गौतम बुद्ध यांनी कोणताही नवीन प्रारंभ केला नव्हता, ज्यांना प्राचीन ज्ञान, परंपरा किंवा धर्म यांच्या विरोधी म्हणता येऊ शकेल.

४. गौतम बुद्ध यांनी त्यांच्या मित्राला पारंपरिक प्रथांचे पालन करण्याचा दिलेला सल्ला

लक्ष्यात घ्या, गौतम बुद्ध यांनी त्यांच्यासारख्या दुसर्‍या ज्ञानी लोकांच्या (मैत्रेय, म्हणजे मित्रता-बंधूभावाचा पालक) आगमनाचीही भविष्यवाणी केली होती. त्यांनी असेही म्हटले होते की, ‘तो ब्राह्मण कुळात जन्म घेईल.’ जर बुद्धांसाठी कुळ, जाती आणि वंश महत्त्वहिन होते, तर त्यांनी असे म्हटले नसते. त्यांचे मित्र प्रसेनादी यालाही तेच समजावले, जे सर्वांत प्राचीन उपनिषद्मध्ये सत्यकाम जाबालाच्या संदर्भात ठरवण्यात आले होते. ते असे की, त्याची आई दासी असली, तरी परिस्थिती त्याच्या वडिलांना ब्राह्मण कुळाची व्यक्ती असल्याचे दाखवत होती. त्यामुळे तो ब्राह्मण बालक होता. अशा प्रकारे तो त्याच्या गुरूंनी स्वीकारलेला शिष्य होता. त्याच पारंपरिक प्रथांचे पालन करण्याचा सल्ला बुद्धांनी त्यांच्या मित्राला दिला होता.

५. हिंदु समाज सोडून दुसरा अहिंदु बौद्ध समाज भारतात कधीच नव्हता, हेच ऐतिहासिक सत्य !

त्यामुळे खरा इतिहास असा आहे की, पूर्व भारतात गंगेच्या खोर्‍यातील मोठे राज्यकर्ते आणि क्षत्रप यांनी गौतम बुद्धांचा सत्कार आपल्यातीलच एक विशेष व्यक्ती म्हणून केला होता. त्याच राज्यकर्त्यांनी बुद्धांचे अनुयायी आणि भिक्षुक यांच्यासाठी मोठमोठे मठ, विहार आदी बांधले. जेव्हा गौतम बुद्ध यांचे देहावसान झाले, तेव्हा ८ नगरांतील राज्यकर्ते आणि प्रतिष्ठित लोकांनी त्यांच्या अस्थींवर दावा केला होता की, ‘आम्ही क्षत्रिय आहोत, त्यामुळे त्यांच्या रक्षेवर आमचा अधिकार आहे.’ गौतम बुद्धांच्या देहांतानंतर अनुमाने अर्ध्या शतकापर्यंत बुद्धांचे शिष्य सार्वजनिकरित्या त्यांच्या जातीय नियमांचे पालन निःसंकोचपणे करत असल्याचे दिसते, जे सहज होते. बुद्धांनीही त्यांना त्यांचे जातीय संबंध तोडण्यास सांगितले नव्हते. जसे आपल्या मुलींचा विवाह अन्य जातींमध्ये करणे इत्यादी.

त्यामुळे ऐतिहासिक सत्य हेच आहे की, हिंदु समाज सोडून दुसरा अहिंदु बौद्ध समाज भारतात कधीच नव्हता. बहुतांश हिंदू विविध हिंदु देवी-देवतांची उपासना करत आले आहेत. त्यात कधी कुणाला जोडण्याचे अथवा तोडण्याचे काम झाले आहे. जसे आज अनेक हिंदूंच्या घरी रामकृष्ण परमहंस, योगी अरविंद किंवा डॉ. आंबेडकर त्याच ओळीत सापडतील, जेथे शिव-पार्वती किंवा राम, दुर्गादेवी आदी विराजमान आहेत. गौतम बुद्ध, संत कबीर किंवा गुरुनानक यांचे उपासक त्याच प्रकारचे होते. ते अन्य बौद्ध किंवा शीख नव्हते.

६. बौद्ध धर्माविषयी दिशाभूल होईल, अशी करण्यात येत असलेली व्याख्या !

जुनी बौद्ध विहार, मठ, मंदिरे इत्यादींमध्ये पाहिले, तर त्यांमध्ये वैदिक प्रतिके आणि वास्तूशास्त्र यांचे आधिक्य पहाण्यास मिळेल. ते जुन्या हिंदु नमुन्यांचेच अनुकरण आहे. जेव्हा बौद्ध धर्म भारताबाहेर पसरला, तेव्हा येथून वैदिक देवताही बाहेर गेल्या, उदा. जपानच्या प्रत्येक नगरात देवी सरस्वतीचे मंदिर आहे. सरस्वतीला तेथे घेऊन जाणारे ‘धूर्त ब्राह्मण’ नाही, तर बौद्ध होते.

जीवनाच्या अंती गौतम बुद्ध यांनी जीवनाच्या ७ सिद्धांताचा उल्लेख केला होता. याचे पालन केल्याने कोणताही समाज नष्ट होत नाही. प्रसिद्ध इतिहासकार सीताराम गोयल यांनी त्यांच्या ‘सप्त-शील’ (वर्ष १९६०) या सुंदर उपन्यासामध्ये त्यालाच वैशाली गणतंत्राच्या पार्श्वभूमीत आपले कथ्य बनवले होते. या ७ सद्गुणांमध्ये आपल्या सण-उत्सवांचा आदर करणे आणि ते साजरे करणे, तीर्थयात्रा अन् अनुष्ठान करणे, साधूसंतांचा सत्कार करणे यांचा समावेश आहे. महाभारतातही नदीच्या किनारी तीर्थयात्रा करण्याची माहिती मिळते. सरस्वती आणि गंगा यांच्या किनार्‍यावर बलराम अन् पांडव तीर्थयात्रा करायला गेले होते. त्यामुळे सामाजिक आणि धार्मिक व्यवहारांच्या दृष्टीने पाहिले, तर गौतम बुद्ध यांनी कधीच जुन्या व्यवहारांना विरोध केला नाही. त्याविषयी काही म्हटले असेल, तरी त्यांचा आदर आणि पालन करण्याविषयीच सांगितले. अशा प्रकारे ते कोणी विद्रोही नव्हते, तर पूर्णपणे परंपरावादी होते. त्यांनी चालू राजकीय किंवा सामाजिक व्यवस्था टिकवून ठेवण्याचा सल्ला दिला होता. ते आजीवन एक हिंदु दार्शनिक राहिले. डॉ. कॉनराड एल्स्ट यांच्या शब्दांमध्ये, ‘गौतम बुद्धांच्या रोमारोमात हिंदुत्व होते’; पण हीच गोष्ट नाकारण्यासाठी बौद्ध धर्माची दिशाभूल करणारी व्याख्या करण्यात येत आहे. ते पारखणे आवश्यक आहे.’

– प्रा. शंकर शरण, ज्येष्ठ लेखक आणि स्तंभकार, देहली. (२१.१०.२०२२)