धर्मशास्त्रानुसार कृती करणे आवश्यक !

नुकत्याच घडलेल्या दोन धर्मशास्त्रविरोधी बातम्या वाचनात आल्या. एक म्हणजे ‘ऑफिस पार्टी लूकसाठी (कार्यालयातील मेजवानीच्या वेळी दिसण्यासाठी) मंगळसूत्र हातावर’ आणि दुसरी अक्कलकोट तालुक्यातील शेतकर्‍यांना अतीवृष्टीचा निधी माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांनी प्राप्त करून दिल्यामुळे शेतकर्‍यांनी त्यांचा १५१ लिटर दूध घालून अभिषेक केला. महान हिंदु संस्कृतीमध्ये विविध देवतांना विविध सूक्त, स्तोत्रे म्हणत अभिषेक करणे, हे मोठे पुण्यदायी आणि इच्छित मनोकामना पूर्ण करणारे कर्म म्हणून सांगितले आहे. विशिष्ट देवतेचे स्तोत्र, मंत्र म्हणत देवतेच्या मूर्तीवर अथवा प्रतिकावर दूध किंवा पाण्याची संततधार धरणे, याला अभिषेक असे म्हणतात. ‘केवळ देवतेचा अभिषेक केला जातो, व्यक्तीचा नाही’, असे धर्मशास्त्र सांगते.

भारतीय जीवन पद्धतीत कुटुंबसंस्थेस अत्यंत मोलाचे स्थान आहे. या कुटुंबसंस्थेचा पाया विवाहसंस्था आहे. सोळा संस्कारांपैकी ‘विवाह’ या संस्काराला स्त्री-पुरुषाच्या जीवनात महत्त्वाचा संस्कार मानले जाते. विवाहात ‘मंगळसूत्र’ या दागिन्यास विशेष स्थान आहे. ‘मंगल’ म्हणजे पवित्र आणि ‘सूत्र’ म्हणजे बंधन. मंगळसूत्राला हिंदु धर्मामध्ये पवित्र बंधन मानण्यात येते. लग्न झाल्यानंतर मंगळसूत्र घालतात; मात्र सध्या काही आधुनिक महिला मंगळसूत्र घालत नाहीत, तर काही महिला मंगळसूत्राचे ब्रेसलेट करून हातात घालतात. मंगळसूत्र हे सौभाग्याचे लक्षण आहे. मंगळसूत्रात दोन पदरी दोर्‍यात काळे मणी गुंफलेले असतात. मध्यभागी ४ छोटे मणी आणि २ लहान वाट्या असतात. दोन दोरे म्हणजे पती-पत्नीचे बंधन. २ वाट्या म्हणजे पती-पत्नी, तसेच ४ काळे मणी म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे ४ पुरुषार्थ ! मंगळसूत्राची लांबी अनाहतचक्रापर्यंत असावी. वाट्यांचा अनाहतचक्राला स्पर्श झाला पाहिजे. यामुळे स्त्रियांचे मन आणि चित्त शांत रहाते. त्या चक्रांमधून स्त्रीला आत्मिक शक्ती मिळते आणि त्याचा प्रभाव संपूर्ण घरावर पडतो.

हिंदु धर्मामध्ये प्रत्येक कृतीला अत्यंत महत्त्व असनू त्यामागे शास्त्र आहे. असे असतांना याचे ज्ञान करून न घेता पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करून कुटुंबसंस्थेचा पायाच डळमळीत केला जात आहे. हिंदूंच्या सण-उत्सव प्रसंगी शिवपिंडीवर काही लिटर दुधाचा अभिषेक केला की, झोपी गेलेले पुरो(अधो)गामी जागे होतात. ते १५१ लिटर दुधाचा अभिषेक केल्यावर ‘ब्र’ही काढत नाहीत. हिंदूंनो, धर्मविसंगत कृती न करता धर्मशास्त्र समजून कृती करा !

– श्री. नीलेश पाटील, जळगाव