१. पुरोगामी नावावर खोटारडेपणा खपवला जायला लागल्याने त्याची पोलखोल करणे
‘पत्रकारितेच्या नावाखाली चालत असलेली राजकीय सौदेबाजी आणि सुपारीबाजी यांच्याविरुद्ध गेली ३०-३५ वर्षे मी एकाकी लढत होतो. त्याविरुद्ध आता सुशील कुलकर्णी, अश्विन अघोर, आबा माळकर, प्रभाकर सूर्यवंशी अशा अनेक तरुण मंडळींनी (राजकीय विश्लेषकांनी) आघाडी उघडली असून ते अतिशय चांगल्या प्रकारे स्वत:ला पुरोगामी म्हणवणारे बुद्धीजीवी हे कसे एखाद्या बदमाशाहून बदमाश आहेत, याची लक्तरे वेशीवर टांगत असतात. मीही गेली ३०-३५ वर्षे हा उद्योग करत आलो आहे; म्हणूनच मुख्य प्रवाहातील माध्यमांपासून मी कायम बहिष्कृत राहिलो. ‘यूट्यूब’ ‘फेसबुक’, ‘ब्लॉग’ किंवा ‘सोशल मीडिया’ हा गेल्या १०-१२ वर्षांत आला आहे. त्याने मला स्वातंत्र्य दिले असून माझी एक ओळख निर्माण झाली आहे. अन्यथा ५० वर्षे पत्रकारितेत घालवल्यानंतरही मला मुंबईबाहेर स्वत:ची अशी ओळख नव्हती. मी कधी कधी ‘विवेक’, ‘मार्मिक’, ‘लोकप्रभा’, ‘श्री’, ‘चित्रलेखा’ अशा साप्ताहिकांमधून लिहित आलो; पण पुरोगामी नावाचे लेबल अंगाला लावून घ्यायला सिद्ध नव्हतो. त्यामुळेच मी सर्व पुरोगामी चळवळीतून वाढत गेलो असलो, तरी आज ज्याला पुरोगामीत्व म्हणतात, ही शुद्ध बदमाशी आहे, हे मी छातीठोकपणे सांगू शकतो. मी रा.स्व. संघाच्या शाखेत गेलो नाही किंवा मला हिंदुत्वाचे फारसे कौतुक वाटले नाही; पण दिवसेंदिवस पुरोगामीत्व इतके खोटे होत गेले, पुरोगामी या नावावर इतका खोटारडेपणा खपवला जायला लागला की, त्याची किळस आली. त्यामुळे यातील पोलखोल करणे मला अगत्याचे वाटले. वर्ष १९८६ मध्ये अनुमाने २६ वर्षांपूर्वी मी ‘जागता पहारा’ हा दिवाळी अंक काढला होता. त्यात तेव्हाचे लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, निखिल वागळेचे ‘आपलं महानगर’, कपिल पाटीलचे ‘आज दिनांक’ अशी विविध दैनिके किती सुपारीबाजी करतात, याची पोलखोल एकहाती दिवाळी अंक लिहून केली होती. या हातावरील थुंकी त्या बोटावर करणे, म्हणजे बुद्धीवाद असल्यासारखा बेशरमपणा त्या वेळी चालू होता.
२. मुख्य प्रवाहातील माध्यमांनी पुरोगामीत्वाचा मुखवटा चढवून राजरोसपणे खोटारडेपणा करणे
हा बेशरमपणा किती असू शकतो ? तर महाराष्ट्र टाइम्सचे संपादक असतांना कुमार केतकर यांनी वर्ष १९९६ मध्ये ‘हितोपदेश’ नावाचा अग्रलेख लिहिला होता. त्यात ‘न्यायाधिशांपासून निवृत्त सैन्याधिकारी, सनदी अधिकारी, बुद्धीजीवी, प्राध्यापक, समाजसेवी वगैरे लोक समाजाची संस्कृती सांभाळतात आणि राजकारणी तेवढे गुन्हेगार आहेत, असे भासवण्याचा एक प्रकार चालतो. पत्रकारांनी समाज आणि समाजातील इतर घटक यांवर अंकुश ठेवावा, हे बरोबर आहे; पण बेफान झालेल्या पत्रकारांवर अंकुश कुणी ठेवायचा ?’, असा प्रश्न उपस्थित केला होता. तेव्हाचे आणि आजचे कुमार केतकर तपासून बघा, म्हणजे बुद्धीजीवी शहाजोगपणा काय असतो ? हे समजते. त्यानंतर त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून गिरीश कुबेर वगैरे सिद्ध झाले, हे त्याच पठडीतील आहेत. त्याचप्रमाणे इंग्रजीमध्ये राजदीप सरदेसाई, सिद्धार्थ वरदराजन अशी मंडळी निर्माण झाली, ज्यांनी काँग्रेसचा नेहरूवाद खरा ठरवण्यासाठी सूर्याला चंद्र ठरवण्यापर्यंत बेशरमपणा केलेला आहे.
आज मला आनंद आहे की, केवळ मराठीसह हिंदी, इंग्रजी आदी भाषांमध्ये, तसेच सामाजिक माध्यमांमध्ये या सर्वांना (सामाजिक माध्यमांतील स्वतंत्र पत्रकारांना) मोकाट रान करून दिले आहे. ‘अविष्कार स्वातंत्र्य हे घटनेने दिले म्हणतात; पण त्यापेक्षा ते सामाजिक माध्यमांनी दिले’, असे म्हटले पाहिजे. ही सगळी मंडळी ‘इंडियन एक्स्प्रेस’, ‘हिंदुस्थान टाइम्स’, ‘द हिंदू’ किंवा ‘टाइम्स ऑफ इंडिया’ अशा मोक्याच्या जागा अडवून बसली होती आणि पुरोगामीत्वाचा मुखवटा चढवून खोटारडेपणा चालू होता.
३. सामाजिक माध्यमे समाजासमोर सत्य उघड करत असल्यामुळे मुख्य प्रवाहातील माध्यमांची विश्वासार्हता संपुष्टात येणे
आज सुशील कुलकर्णी किंवा अश्विन अघोर यांनी त्यांच्या यू ट्यूब वाहिनीवरून कुबेर किंवा सिद्धार्थ वरदराजनच्या ‘द वायर’ नावाच्या पोर्टलचा पर्दाफाश केला आहे. त्या निमित्ताने आपण परत यावर बोलावे, असे वाटले. त्यांच्याकडून सुटलेला संदर्भ सांगणे मला अगत्याचे वाटते. ही माणसे लोकांसमोर सत्य आणत नव्हती, तर सत्य लपवत होती. त्यांचे पुरोगामीत्व सत्य लपवण्यासाठी कसे होते ? त्यावर सर्वांत मोठा आघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. वर्ष २००२ मध्ये नरेद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्या वेळी ते अननुभवी असल्याने तेथील दंगल त्यांना आवरती आली नाही. तेव्हा ‘त्यांनी ती जाणीवपूर्वक घडवून आणली’, असे सांगण्याचा प्रयत्न पुढचे १२ वर्षे अखंड चालू राहिला. जेव्हा मोदी यांच्या लक्षात आले की, आपण यांना खुलासा देऊ शकत नाही; कारण त्यांना खुलासा नकोच आहे. त्यांना आपल्याला केवळ आरोपी ठरवायचे आहे आणि फासावर चढवायचे आहे’, तेव्हा त्यांनी ‘मीडिया ट्रायल’मध्ये सहभागी व्हायचे नाही आणि आपण आपल्या विरोधातील खोटे आरोप सिद्ध करण्याठी सहकार्य करायचे नाही, असे ठरवून वेगळी वाट चोखाळली अन् संपूर्ण माध्यमांना बहिष्कृत केले.
ज्या काळात ते माध्यमांना बहिष्कृत करत होते, त्याच काळात ‘सोशल मीडिया’चा उदय झाला. त्यानंतर त्याचे एका पाठोपाठ अनेक ‘प्लॅटफार्म’ येत गेले. आधी फेसबुक होतेच नंतर यूट्यूब, ई-मेलचे गट वगैरे आले. त्यांच्या माध्यमातून सामान्य मनुष्य, वाचक आणि श्रोता मोठ्या प्रमाणावर मुख्य प्रवाहातील माध्यमांचा खोटारडेपणा उघडा पाडत गेला अन् मुख्य प्रवाहाची मक्तेदारी संपली. ‘आमच्या अधीन माहिती आहे. त्यामुळे ‘आम्ही बांधू ते तोरण आणि आम्ही सांगू ते धोरण’, हा जो प्रकार चालू होता, त्याच्या मुळावरच मोदी यांनी घाव घातला. त्यांची मोठ्या प्रमाणात मानहानी चालू होती. तेव्हा त्यांनी सामाजिक माध्यमांच्या उदयाचा चतुराईने वापर करून घेतला. तेव्हा मोदींप्रमाणे सामान्य माणसांनाही कळत होते की, आपण वाचतो, ते खोटे आहे आणि ते उघडे पाडले पाहिजे. मोदींसारखी व्यक्ती जेव्हा सामाजिक माध्यमांचा वापर करू लागली, तेव्हा हळूहळू सामान्य जनतेनेही सामाजिक माध्यमांचा आधार घेतला आणि सर्व ‘माध्यमा’ला एवढे उघडे करून टाकले की, आज या ‘माध्यमा’ची विश्वासार्हता संपलेली आहे. आज बहुतेक वृत्तवाहिन्यांना बातम्यांमध्ये काय ‘व्हायरल’ झाले, हे सांगावे लागते, यातच सर्व आले. ‘सातत्याने खोटे बोललो, तर लोकांना ते खरे वाटेल’, हा खुळा आशावाद असतो. कधी ना कधी यातील १० माणसे एकमेकांसमोर येतात, तेव्हा त्यांच्या चर्चेतून खोटेपणा उघडा पडतो. अशा रितीने सर्व नामवंत संपादक खोटे पडत गेले. त्यांची जनतेतील प्रतिमा ढासळत गेली.
(ऑक्टोबर २०२२) (क्रमशः)
– श्री. भाऊ तोरसेकर, ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/629432.html/
संपादकीय भूमिका ‘सातत्याने खोटे बोललो, तर लोकांना ते खरे वाटेल’, हा पुरोगाम्यांचा खुळा आशावाद हिंदूंनी उघड पाडायला हवा ! |