(म्हणे) ‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे इंग्रजांसाठी काँग्रेसच्या विरोधात काम करायचे !’

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे ‘भारत जोडो’ यात्रेत सावरकद्वेषी विधान

वाशिम – ‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे इंग्रजांसाठी काँग्रेसच्या विरोधात काम करायचे, असे सावरकरद्वेषी विधान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केले. वाशिम येथे ‘भारत जोडो’ यात्रेत ते बोलत होते. गांधी यांच्या या विधानावरून त्यांच्यावर राज्यभरातून टीका केली जात आहे. अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना, तसेच सावरकरप्रेमी यांनीही गांधी यांचा निषेध केला आहे.

(म्हणे) ‘सावरकरांविषयी मी सत्य तेच बोललो, त्यात चुकीचे काय ?’ – राहुल गांधी, नेते, काँग्रेस

स्वतःवरील टीकेविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना १७ नोव्हेंबर या दिवशी अकोल्यातील चानी फाटा वाडेगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी मी जे वक्तव्य केले होते, त्यात चुकीचे काहीच नाही. जे ऐतिहासिक सत्य आहे, तेच मी मांडले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजांना क्षमेचे पत्र लिहिले होते, यावर मी ठाम आहे.’’ (खोटे बोल; पण रेटून बोल, या वृत्तीचे काँग्रेसचे नेते राहुल गांधी ! – संपादक) या वेळी गांधी यांनी सावरकरांनी ब्रिटीश सरकारला लिहिलेल्या पत्रातील काही ओळी वाचून दाखवल्या. ‘सावरकरांनी त्यांच्या पत्रात इंग्रजांना उद्देशून ‘सर मै आपका नौकर रहना चाहता हूँ ।’ असे लिहिले आहे. या पत्राखाली वीर सावरकर यांची स्वाक्षरीही आहे. यानंतर सावरकरांनी मोहनदास गांधी आणि सरदार पटेल यांनाही अशी स्वाक्षरी करण्यास सांगितले होते. सावरकरांनी सर्व देशासह तेव्हा स्वातंत्र्यलढ्यात असलेल्या काँग्रेसशी विश्‍वासघात केला’, अशी गरळओकही त्यांनी या वेळी केली.

गांधी पुढे म्हणाले की, मोहनदास गांधी, पंडित नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनाही इंग्रजांनी अनेक वर्षे कारागृहात डांबले होते; पण त्यांनी कधी ब्रिटीश सरकारला पत्र लिहून स्वतःची सुटका करून घेतली नाही. हा या २ विचारधारांतील फरक आहे. (खोटी वक्तव्ये करून जनतेची दिशाभूल करणार्‍या राहुल गांधी यांची कीव करावीशी वाटते ! – संपादक) ‘हे पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि डॉ. मोहन भागवत यांनाही दाखवा’, असेही त्यांनी सांगितले.

मनसे राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवणार !

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात वक्तव्य केल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींसह ठाकरे गटावर टीका केली आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवण्याचा आदेश कार्यकर्त्यांना दिला आहे.

संपादकीय भूमिका

  • राहुल गांधी यांच्या या विद्वेषी विधानावरून त्यांची ‘भारत जोडो’ यात्रा आहे कि ‘भारत तोडो’ यात्रा आहे ? हे कुणीही सांगेल ! राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणार्‍या अशा यात्रांवर सरकारने तात्काळ बंदी घातली पाहिजे !
  • स्वातंत्र्यपूर्व काळात ज्या काँग्रेसची स्थापनाच इंग्रजांनी केली, त्या इंग्रजधार्जिण्या काँग्रेसच्या नेत्याने प्रखर राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर अशी टीका करणे हास्यास्पद आहे !
  • म. गांधी आणि नेहरू यांनी इंग्रजांचे लांगूलचालन केल्याने इंग्रजांनी कधीही त्यांच्यावर कठोर कारवाई केली नाही, हा सत्य इतिहास आहे. याउलट सावरकरांनी देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून सोडवण्यासाठी स्वतःच्या जिवाची पर्वा केली नाही. त्यांनी देशासाठी प्राणार्पण करण्यास सिद्धता दाखवल्यानेच इंग्रजांनी त्यांचा आतोनात छळ करून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा भोगायला लावली. हा सत्य इतिहास राहुल गांधी जनतेसमोर मांडण्याचे धाडस दाखवतील का ?