काँग्रेसचे नेते सतीश जारकीहोळी यांच्या विरोधात भाजपची निदर्शने !

निदर्शने करतांना भाजप कार्यकर्ते 

पिंपरी – हिंदु धर्म आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणारे कर्नाटक काँग्रेस प्रदेश समितीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या विरोधात भाजपचे शहराध्यक्ष, तसेच आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली मोरवाडी येथील मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयासमोर भाजपने निदर्शने केली. काँग्रेसचे नेते जारकीहोळी यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. छत्रपती संभाजी महाराजांना दिलेली ‘धर्मवीर’ उपाधी आणि मराठे यांचा अपमान करत त्यांनी मुक्ताफळे उधळली, असा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला. या वेळी आमदार महेश लांडगे, जिल्हा संघटन सरचिटणीस, जिल्हा सरचिटणीस, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

‘छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ही आमची अस्मिता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीकडून अशा दायित्वशून्य आणि अवमानकारक वक्तव्याचा निषेध होत आहे. काँग्रेसच्या या नेत्याचा आम्हीही तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो, असे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

हिंदू संघटित नसल्यामुळेच कुणीही उठतो आणि हिंदु धर्म अन् राष्ट्रपुरुष यांवर टीका करतो. सर्व हिंदूंनी एकत्र येऊन स्वत:ची शक्ती दाखवल्यास हिंदु धर्म आणि राष्ट्रपुरुष यांवर टीका करण्याची कुणाचीही हिंमत होणार नाही !