मुंबई – खासदार नवनीत राणा यांच्या बोगस जातपडताळणी प्रमाणपत्राच्या प्रकरणातील सुनावणी सर्वाेच्च न्यायालयात चालू असल्यामुळे मुंबई सत्र न्यायालयाने खासदार नवनीत राणा यांना १९ नोव्हेंबरपर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिले आहेत. शिवडी येथील दंडाधिकारी न्यायालयाने नवनीत राणा यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढले होते.
शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेकर यांनी नवनीत राणा यांचे जातप्रमाणपत्र बोगस असल्याची तक्रार करत वर्ष २०१७ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात त्यांच्या निवडणुकीला आव्हान दिले होते. यावर ८ जून २०२१ या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचे जातप्रमाणपत्र रहित केले. न्यायालयाने जातप्रमाणपत्र रहित केल्यामुळे राणा यांची खासदारकी धोक्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला नवनीत राणा यांनी सर्वाेच्च न्यायालयात जून २०२१ मध्ये आव्हान दिले होते.