अभ्यासूवृत्ती आणि ज्ञानलालसा !

श्री. दुर्गेश परुळकर

१. ज्ञान मिळवण्यासाठी ‘जिज्ञासू हाच ज्ञानाचा अधिकारी’, ही म्हण प्रत्येकाने लक्षात ठेवणे आवश्यक !

‘आता आपल्याला सर्व काही कळले आहे. याहून अधिक काही जाणून घेण्याची आपल्याला आवश्यकता नाही. सर्व विषयांचे परिपूर्ण ज्ञान आपल्याला प्राप्त झाले आहे’,  अशी जर कुणाची धारणा असेल, तर तो निवळ मूर्खपणा आहे. या ब्रह्मांडात असलेले ज्ञान अमर्याद आहे. मानवाने या अमर्याद ज्ञानातील अत्यंत अल्प ज्ञान संपादन केले आहे, म्हणजेच मानवाला अजूनही अनेक गोष्टी अज्ञात आहेत. त्याला कोणत्याही विषयाचे परिपूर्ण ज्ञान अद्यापही झालेले नाही, म्हणजेच मोठ्या प्रमाणावर अज्ञानी असतांनाही तो स्वतःला ज्ञानी आणि पंडित म्हणवत असेल, तर त्याच्यासारखा दुसरा मूर्ख जगात नाही. हे एवढ्यासाठीच सांगण्याची आवश्यकता आहे की, ६.११.२०२२ या दिवशी नाशिकमध्ये प्रगतीशील लेखक आणि साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात ज्येष्ठ लेखक आणि संशोधक डॉ. प्रमोद पाठक सहभागी होण्यासाठी गेले होते. त्या वेळी त्यांनी पशुपती मुद्रेसारखी टोपी घातली होती. त्यांचा वैदिक साहित्य आणि सिंधु संस्कृती या विषयाचा दांडगा अभ्यास आहे. या विषयावर त्यांची संशोधनपर पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.

दैनिक ‘मुंबई तरुण भारत’च्या ६.११.२०२२ च्या अंकात ‘आर्य आक्रमणाच्या थोतांडाला साम्यवादी मक्केतून सुरूंग !’, असे शीर्षक असलेला एक संशोधनपर लेख प्रसिद्ध झाला. तो अंक डॉ. पाठक यांनी संमेलनाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सदस्यांना भेट म्हणून दिला. त्या सर्वांनी तो अंक स्वीकारलाही. एवढेच नव्हे, तर संमेलन चालू होण्यापूर्वी एका कार्यकर्त्याकडून त्यांनी स्वतःची व्यासपिठावरील छायाचित्रेही काढून घेतली. अचानक संयोजकांपैकी एका गृहस्थाने त्यांना ‘तरुण भारतचे अंक भेट म्हणून कुणाला देऊ नका’, असे सांगितले, तसेच ‘पशुपती टोपी काढून संमेलनात बसा’, असेही त्यांना सांगण्यात आले. या वेळी त्यांना ‘संमेलनाच्या विषयाशी तुमचा लेख जुळत नाही’, असेही सांगण्यात आले.

या वेळी त्यांनी त्यांचा लेख किती उपयुक्त आहे आणि त्यातील संशोधनाचा आढावा लोकांपर्यंत पोचला पाहिजे. त्याची नितांत आवश्यकता आहे, या सर्व गोष्टी त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला; पण त्यांची बाजू ऐकून न घेता त्यांना ‘टोपी काढून बसा, तसेच तुम्ही तुमच्या समवेत आणलेल्या अंकाचे वाटप करू नका. अन्यथा संमेलनाचे ठिकाण सोडा’, असे स्पष्टपणे सांगण्यात आले. वास्तविक ते तो अंक वितरीत करत असतांना त्यांना कुणीही हटकले नव्हते. डॉ. पाठक यांनी ‘तरुण भारत’चा तो अंक साम्यवादी पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते भालचंद्र कांगो आणि प्रसिद्ध लेखक अर्जुन डांगळे यांना भेट म्हणून दिला, तरीही सभ्यतेने; पण ठामपणे त्यांना त्या संमेलनातून बाहेर काढण्यात आले.

२. नवीन ज्ञान मिळवण्यासाठी स्वतःत विनयशीलता आणि नम्रता असणे विद्वत्तेचे लक्षण होय !

स्वतःला प्रगतीशील म्हणवणार्‍या साम्यवादी विद्वान लोकांना ज्ञानलालसा नाही हेच खरे. ज्या गोष्टी आपल्याला पटत नाहीत, त्यांचा काही झाले, तरी स्वीकार करायचा नाही, अशी भूमिका कुणी घेतली, तर ती हानीकारक ठरते. आपल्याला एखादी गोष्ट जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांची भूमिका स्वीकारावी लागते. दुसर्‍याचे विचार आपल्याला पटत नसले, तरी ते शांतपणे ऐकून घ्यावे लागतात. त्यानंतर आपण आपली मते व्यक्त करू शकतो. तसेच ज्या गोष्टी आपल्याला पटल्या नाहीत, त्या सप्रमाण आपल्याला खोडून काढता येतात.

यासमवेतच एखाद्याने संशोधन करून काही नवीन गोष्टी प्राप्त केल्या असतील, तर त्याचे ते म्हणणे ऐकून घेणे, हे विद्वत्तेचे लक्षण आहे. विचारांचे मंथन झाले पाहिजे. चांगले काहीतरी हाती लागण्यासाठी साधकबाधक चर्चाही होणे नितांत आवश्यक आहे. किंबहुना या गोष्टींची आवश्यकता असते. त्यामुळेच आपल्याला नवीन अधिक सकस आणि चांगले कळू शकते. आपण आधी स्वीकारलेल्या गोष्टी या खरोखर त्याज्य असतील, तर त्या टाकून देणे आणि  योग्य गोष्टींचा स्वीकार करणे, हेच विद्वत्तेचे खरे लक्षण आहे. एक प्रकारे आपण आपली अज्ञानाची कात टाकून ज्ञानाची नवी झळाळी प्राप्त करत असतो. त्यासाठीच अन्य विद्वानांसमवेतच चर्चा करणे आणि त्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न करणे, ही ज्ञानलालसा आहे.

३. समाजाचा वैचारिक आणि बौद्धिक विकास साधण्यासाठी विद्वानांनी अहंभावाचा त्याग करणे आवश्यक !

त्यासमवेतच नवी गोष्टी शिकून घेण्यासाठी लागणारी विनयशीलता आणि नम्रता आपल्यात असली पाहिजे. तेच विद्वत्तेचे खरे लक्षण आहे. या गोष्टींचा अभाव असेल, तर समाजामध्ये परस्परविरोधी दोन गट उभे रहातील. परिणामी समाजाच्या वैचारिक आणि बौद्धिक विकासाला खीळ बसेल. समाजाची ज्ञानलालसा वाढणार नाही. अहंकारासारखी समाजविघातक विकारी वृत्ती बळावेल. हे सर्व धोके टाळण्यासाठी समाजातील सर्व विद्वानांनी आपला अहंभाव सोडून द्यावा. साधकबाधक चर्चा करावी आणि शुद्ध ज्ञानाचा अनुभव घ्यावा. समाजालाही अज्ञानाच्या अंध:कारातून ज्ञानाच्या तेजाकडे घेऊन जाण्यास साहाय्य करावे.

४. विद्वद्जनांनी अहंभाव त्यागून साधकबाधक चर्चा करणे, हे मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी पोषक असणे 

वैदिक काळातही ऋषीगणांमध्ये साधकबाधक चर्चा होत होती. अध्यात्मातील ‘ज्ञानमार्ग, कर्ममार्ग, संन्यासमार्ग, योगमार्ग आणि भक्तीमार्ग हे मार्ग जरी भिन्न भिन्न असले, तरी ईश्वरप्राप्ती हे अंतिम ध्येय कोणत्याही मार्गाने वाटचाल केली, तरी प्राप्त करता येते’, असा निष्कर्ष काढणे सुलभ झाले. याविषयी आता शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळेच विद्वान जन कोणत्याही मार्गाचा पुरस्कार करत असतील, तरीही ते एकच सांगत आहेत. त्यांनी सांगितलेल्या कोणत्याही मार्गात खोट नाही. एकच सत्य ज्ञानीजन विविध प्रकारे सांगतात. हाच सिद्धांत जगासमोर मांडता आला; कारण सर्व विद्वद्जन एकत्र येऊन त्यांनी साधकबाधक चर्चा केली, अहंभाव बाळगला नाही.

आपले आचार, विचार आणि ज्ञानसंपादन यांच्या मार्गात कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये, यासाठीच अशा प्रकारची निरोगी चर्चा मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी पोषक ठरते. याचा वस्तूपाठ ऋषीगणांनी आपल्याला घालून दिला आहे. याचे भान राहिले नाही, तर ‘मी म्हणतो तेच खरे’, अशी हेकेखोर भूमिका एखाद्या विद्वान माणसाचा अवमान करण्याचा प्रमाद करण्याएवढी उन्मत्त होते. परिणामी मानवाचा प्रवास विकासाच्या दिशेने होण्याऐवजी र्‍हासाच्या दिशेने चालू होतो.

५. समाजाने विशुद्ध ज्ञानाकडे पाठ फिरवू नये, यासाठी त्यांच्यातील अभ्यासू वृत्ती आणि ज्ञानलालसा जागृत ठेवणे आवश्यक ! 

ज्ञान हे अत्यंत तेजस्वी आहे. तेजस्वी ज्ञान संपादन केल्यावर आपल्या अनेक चुकांचा नाश होतो. म्हणजेच योग्य ज्ञान प्राप्त झाल्यावर आपल्या हातून चुका होत नाहीत. आपल्या हातून कोणतीही चूक घडू नये आणि त्या चुकांचे दुष्परिणाम मानवी समाजाला भोगावे लागू नयेत, या सद्हेतूनेच साधकबाधक चर्चा होणे नितांत आवश्यक आहे. ही समज विद्वान म्हणवणार्‍या लोकांमध्ये नसेल, तर ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे. अशा वर्तनाने नकळत समाजातील अभ्यासू वृत्ती आणि ज्ञानालालसा लोप पावेल; म्हणून सर्वांनी वेळीच सावध होणे नितांत आवश्यक आहे. सत्य जाणून घेण्याची जिज्ञासा मृत पावली, तर मानवाचा विकासही ठप्प झाला म्हणून समजावे. ज्ञान म्हणजे मानवी समाज जीवनाचा प्राणवायू आहे. या विशुद्ध ज्ञानाकडे पाठ फिरवणे आत्मघात आहे. हा आत्मघात टाळण्यासाठीच अभ्यासू वृत्ती आणि ज्ञानलालसेचे जतन करणे आवश्यक आहे.’

–  श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली (१३.११.२०२२)